प्रत्येक प्रांताची भाषा भिन्न असल्यामुळे भारतामधे भाषा प्रश्न गंभीर बनला आहे. आपले राज्य सोडून इतरत्र जावे लागले की त्या त्या राज्याची भाषा शिकणे क्रमप्राप्त होणे हे केवळ दाक्षिणात्य राज्यांव्यतिरिक्त इरतत्र फारसे लागू होत नाही, ह्याचे कारण हिंदीचा मध्य व उत्तर भारतात झालेला प्रादुर्भाव. ह्याचे फायदे असले तरी तोटेही आहेत. ह्याच प्रादुर्भावामुळे मूळ हिंदी भाषिकांचा 'आम्हास इतर राज्यीय भाषा शिकण्याची आवश्यकता नाही' असा (गैर)समज झाला आहे.
देशाची म्हणून अशी एक भाषा असावी हे ही योग्यच. अनेक भाषा बोलल्या जाणार्या देशामधे 'जास्त प्रमाणात' बोलली जाणारी भाषा ही राष्ट्रभाषा ठरावी ह्यात गैर ते काही नाही. ह्यामधे दाक्षिणात्यच काय, परंतु मराठी, गुजराथी, बंगाली वगैरे भाषिक लोकांवरही ३ (मातृभाषा, राष्ट्रभाषा व आंग्लभाषा) भाषा शिकण्याची सक्ती होते, परंतु त्यात काही गैर आहे असे मला वाटत नाही.
हिंदी चित्रपटांच्या माध्यमातून आज हिन्दी भाषा भारतभर पोहोचली आहे. त्यामुळे तोडकंमोडकं हिन्दी बोलणारे व (चित्रपटीय) हिन्दी भाषा समजणारे अनेक लोकं दाक्षिणात्य राज्यांमधे सापडतात. हा माझा स्वानुभव आहे.
फाडफाड इंग्रजी बोलता येणारा तो उच्चभ्रू व बाकीचे गावठी हा समज महाराष्ट्रात विशेषत: मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरांमधे मोठ्या प्रमाणात आढळतो. मराठी न येणार्या माणसाचे मुंबईमधे काडीमात्र अडत नाही. मराठी माध्यमातून शिक्षण घेणार्याला आंग्लमाध्यमातील मूल कनिष्ठ समजते. आज आंग्ल ही ज्ञानभाषा झाली आहे, आणि ती जरूर शिकावी, परंतु त्यासाठी मराठी बोलणार्यास कनिष्ठ समजण्याचे काहीच कारण नाही. आंग्ल माध्यमातून शालेय शिक्षण झालेल्यांना मराठी नीत लिहिता-वाचता येत नाहीच, परंतु त्याबद्दल वैषम्यही न वाटणे ही माझ्या दृष्टीने गंभीर बाब आहे. शालेय शिक्षण मराठीतून होऊनही महाविद्यालयीन शिक्षण इंग्रजीतून झाल्यावर इंग्रजीचा प्रभाव एवढा होतो की साध्या साध्या शब्दांसाठीही आंग्ल प्रतिशब्द वापरले जातात. उदा. कृपया, धन्यवाद, यादी, अवघड वगैरे. फार दूर जाण्याची गरज नाही, मनोगतींनी लिहिलेली मनोगतेही अनेक आंग्ल शब्दयुक्त असतात. सर्व इंग्रजी शब्दांना योग्य मराठी प्रतिशब्द सुचणे अवघड असते, हे मान्य केले तरीही किमान रोजच्या वापरातील, साध्या शब्दांसाठी ही इंग्रजी शब्द वापरणे किती योग्य आहे?