प्रतिक्रियांबद्दल मनःपूर्वक धन्यवाद

चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले  हे पूर्ण  गाणे

आणि त्याचा मला लागलेला अर्थ मी मांडू इच्छितो.

गीत: राजा बढे
संगीत: पं. ह्रदयनाथ मंगेशकर
गायिका: आशा भोसले


चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले
ओंजळी उधळीत मोती हासरी तारा फुले  (ध्रु)

(पौर्णिमेच्या चंद्राचे चांदणे केवढे पडते हे माहित आहेच. चंद्रापेक्षा ४ पट मोठ्या व तेजस्वी असलेल्या पृथ्वीचे अतिशय प्रखर असे चांदणे चंद्रावर पडते. पृथ्वीचा फिरण्याचा वेग चंद्रापेक्षा अधिक आहे. चंद्राप्रमाणे एकच बाजू न दिसता पृथ्वीची पूर्ण प्रदक्षिणा चंद्रावरून दिसू शकते. म्हणुन इथे तिला "चांदणे शिंपीत जाणारी चंचला" असे म्हटले आहे.
वाहते आकाशगंगा की कटीची मेखला
तेज:पुजाची झळाळी तार पदरा गुंफीले (१)

(चंद्रावरून दिसण-या आकाशात पृथ्वीवरून दिसणा-या आकाशापेक्षा कितीतरी अधिक तारे दिसतात. आपली आकाशगंगा फक्त गडद काळोख्या रात्रीच दिसू शकते ती चंद्रावरून सहज दिसत असेल.त्या आकाशगंगेच्या पार्श्वभूमीवरून तेजाने झळाळत जाणारी पृथ्वी छानच दिसत असेल.

गुंतविले जीव हे मंजीर की पायी तुझ्या
जे तुझ्या तालावरी , बोलावरी नादावले  (२)
(चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह, तिच्या गुरूत्वाकर्षणात बद्ध होऊन तिच्या भोवती घिरट्या घालणारा. हेच तर सत्य या वरील ओळीत सांगितले आहे.

गे निळावंती कशाला झाकशी काया तुझी
पाहुदे मेघाविण सौंदर्य तुझे मोकळे  (३)
(हवामान वृत्तामध्ये उपग्रहाकडून मिळालेला फोटो पहा किंवा स्पेसशटलमधून दिसणारी पृथ्वी पहा. ती निळीशार दिसते. आणि मध्ये मध्ये पांढरे मेघ (ढग) दिसतात. असे दृश्य फक्त विमानातून किंवा त्याहून अधिक उंचीवरून दिसू शकते. वरील २ ओळी याच सौंदर्याचे वर्णन करत आहेत, नाही का?

कवीच्या प्रतिभेचा अविष्कार इथे का दिसतो? तर हे गाणे माझ्या माहिती प्रमाणे १९५६ साली ह्र्दयनाथ मंगेशकरांनी संगीतबद्ध केले. हे त्यांचे पहिले भावगीत.(ध्वनिफीतीवर १९६६ दिले आहे.)
त्यावेळी पहिला कृत्रिम उपग्रह स्पुटनिक सोडला गेला नव्हता. तो रशियाने सोडला ४  ऑक्टोबर १९५८ ला. तेव्हाही आजच्या प्रमाणे अवकाशातून घेतलेले फोटो सहजासहजी उपलब्ध नव्हते. त्यामुळे कवी राजा बढे यांच्या कल्पनाशक्तीला दाद द्याविशी वाटते. या गाण्याचे रहस्य पं. ह्र्दयनाथ मंगेशकरच सांगू शकतील. कारण ते कोणतेच गाणे अर्थ न समजता संगीतबद्ध करत नाहीत.
याबद्दल अधिक माहिती मिळाल्यास कृपया मनोगतवर पोस्ट करा.

धन्यवाद.