लेखातले ग़ालिबप्रेम आवडले. महाकवी ग़ालिबबाबत अनेक किंवदंती मशहूर आहेत. सगळ्या घटना खऱ्या असतीलच असे नाही. ग़ालिबभवती असलेले गूढतेचे वलय हटवणे, त्याचे डिमिस्टिफ़ेकशन करणे गरजेचे आहे.
ग़ालिबचे अर्थ अनेक आहेत. केवळ वरचढ असा अर्थ नाही.
१. बलवान, शक्तिशाली
२. विजयी, जेता
३.दमन करणारा
४. संभावित
ग़ालिबला संभवत: सगळेच अर्थ अपेक्षित असावेत. संभवतः साठी ग़ालिबन हा उर्दू शब्द आहे.असो. 'लांगूलचालना'वरून ग़ालिबची प्रसिद्ध शेर आठवला-
ग़ालिब वज़ीफ़ाख़ार हो दो शाह को दुआ
वो दिन गये के कहते थे नौकर नहीं हूं मैं
[अवांतर- उर्दूत ख़े नंतर वाव आल्यास वाव चा उच्चार गळून पडतो. त्यामुळे ख़्वार, ख़्वाब, ख्वाहिश हे उच्चार प्रचलित असले तरी शुद्ध किंवा फ़सीह नाहीत. वजीफ़ाचा अर्थ मानधन, निर्वाहभत्ता. ख़ार (हा काटा नाही. फ़ारसीत ह्याचा उच्चार ख़ॉर असा करतात) ह्या शब्दाचा अर्थ आहे खाणारा. नफेखोर आणि हरामखोर ह्या शब्दातल्या ख़ोर प्रमाणेच ख़ार हा शब्द ख़ुर्दन(खाणे) ह्या फ़ारसी शब्दापासून आला आहे.]
संजोप राव ह्यांचे लेख वाचून माझेही हात सुळसुळत आहेत. जसे फ़ारसी काव्यातून घेतलेल्या, हाफ़िजकडून घेतलेल्या कुठल्या प्रेरणांचा, कल्पनांचा आढळ ग़ालिबच्या काव्यात आहे. त्या कल्पनांना त्याने स्वतःचा रंग कसा दिला आहे.
तसेच ग़ालिबच्या काव्याची आधुनिकता, अब्र क्या चीज़ है हवा क्या है वगैरे, वगैर, वगैरे.
सध्या ग़ालिब अकादमीने प्रसिद्ध केलेले डॉ. शम्सुरर्हमान फ़ारुक़ी ह्यांचे तफ़हीमे ग़ालिब (ग़ालिबचा बोध) हे पुस्तक वाचतो आहे. तसेच बिजनौरी, मुसहफ़ी, तबातबाई, हाली सारख्या इतर भाष्यकारांच्या विश्लेषण जिथे असमाधानकारक वाटले किंवा ज्या शेरांचा अर्थ लागत नाही असेच १३८ शेर ह्या पुस्तकात समाविष्ट आहे. ग़ालिबमित्रांनी वाचावेसे पुस्तक आहे.
डॉ. फ़ारुकींनी समीक्षेचे आणि टीकेचे पौर्वात्य आणि पाश्चिमात्य निकष ग़ालिबच्या काव्याला लावले आहेत. उर्दू काव्यावर आणि सुबुक हिंदी( भारतात बोलली जाणारी फ़ारसी) काव्यावर असणारा संस्कृत काव्याचा प्रभावाकडे अभ्यासकांचे ध्यान त्यांनी वळवले आहे. त्यांची हाउ टु रीड इक़बाल ही पुस्तिका जरूर वाचावी.
असो. निवांत वेळ मिळाल्यास नक्कीच लिहीन. संजोप राव ह्यांना पुढील लेखांसाठी शुभेच्छा.
चित्तरंजन