गेले पन्नास वर्षे हिंदीला राष्ट्रभाषा करायचा प्रयोग केला गेला आहे. पण तो साफ फसला आहे. मराठी लोकांनी आपल्या भाषेला दुय्यम स्थान स्वीकारुन हिंदीचा पुरस्कार केला पण त्याने मराठीचेच नुकसान झाले आहे. माझ्या मते आपणही तमिळ व तेलगु लोकांप्रमाणे आपल्या भाषेचा अभिमान बाळगावा. आणि पोटापाण्याकरिता इंग्रजी शिकावे.
आज हिंदी ही कागदोपत्री वापरायची भाषा नसून ती केवळ स्ट्रीट लँग्वेज आहे. गरज पडल्यास ती रस्त्यावर शिकावी आणि तिथेच वापरावी.
मी हिंदीचा तिटकारा करत नाही. पण माझ्यामते ती वर्गात शिकणे सक्तीचे असू नये. वर्गात शिकलेल्या हिंदीचा काहीही उपयोग नाही. कुणाला हौस असेल तर त्याने ती शिकावी पण सक्तीने नाही. 

 आज सरकारदरबारी, बँकेत, अन्य उद्योगात हिंदीवाचून काही अडत नाही. अगदी राष्ट्रपती वा पंतप्रधान बनायलासुध्दा हिंदी लागत नाही. तेव्हा आपण हिंदीचा नाद सोडावा हेच खरे.
   हिंदी भाषेतले साहित्य, विज्ञान, संस्कृती ही अन्य प्रादेशिक भाषांच्या तोडीचीच आहे. इंग्रजीप्रमाणे त्यात ज्ञानाचा महासागर वगैरे आजिबात नाही. तेव्हा त्या दृष्टीनेही हिंदीचा काही फायदा नाही. 
  हिंदीच्या कच्छपी लागून आपण मराठीला गौण केले आहे. मुंबईत दोन मराठी लोक हटकून हिंदीत बोलतात. एकेकाळी हिंदीच्या तोडीस तोड सिनेमे बनवणारे आपण मराठी आज सिनेमाच्या बाबतीत दयनीय स्थितीत आहोत. श्वास वगैरे सारखे सिनेमे अपवादच.