काही प्रश्न आणि काही स्पष्टीकरण द्यायचा प्रयत्न करतो.
१) मुळात मी माझ्या कोणत्याही प्रतिसादात, कोणत्याही प्रकारच्या संगीताला वाईट म्हणालो नाही. शं-ज. ह्याच्या संगीताच्या पद्धतीबद्दल मात्र मी जरूर आक्षेप घेतला आहे. एखादे संगीत एखाद्याला आवडते, एखाद्याला आवडत नाही. त्याने संगीताचा दर्जा वा गुणवत्ता कमी होते का ?
२) संगीतबद्धल वाद-विवादात, जे आपल्याला आवडते, तेच "चांगले आणि खरे संगीत" असाच काही एक होरा सर्वांचा असतो, तो कितपत योग्य आहे ?
३) चांगले आणि गुणवत्तापूर्ण संगीताच्या नक्की काय व्याख्या आहेत ? संगीताचा "दर्जा" ठरविण्याचे नक्की काय परिमाण आहे ? ह्या व्याख्या आणि परिमाण व्यक्तिसापेक्ष नाहीत का ?
४) भरपूर काळ टिकले म्हणून एखादे संगीत चांगले असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा भरपूर काळ म्हणजे नक्की किती ?
५) कानाला आवडते ते आणी मनाला आवडते ते चांगले संगीत असे जेव्हा म्हटले जाते, तेव्हा, त्याचे सर्व श्रेय संगीतालाच जाते का ? एकाच घरात, ज्याप्रकारची गाणी आजोबा ऐकतात तिच आणी आपसूक वडीलही ऐकू लागतात, आणि मुलांवरही अश्याच गाण्याचे संस्कार होतात, आपोआपच तो ही सवयीने त्याच प्रकारचे संगीत ऐकू लागतो. ह्यात एकाच प्रकारचे संगीत ऐकायची "सवय" ही ते संगीत टिकण्याचे एक मोठे कारण नसू शकते का ?
६) माझ्या "जुनी पिढी गेली की जुने संगीतही जाईल" ह्या वाक्यावर बऱ्याच जणांनी असहमती दर्शविली आहे. पण, एके काळी, सैगल ऐकणारी जी पिढी होती, त्या पिढी बरोबरच ते संगीतही काळाच्या पडद्या आड गेलेच की नाही ? मग हाच न्याय त्या नंतरच्या जुन्या गाण्यांना नाही का लावता येणार ? की आज फ़ारकोणी सैगल ऐकत नाही ह्याच अर्थ ते संगीत खराब होते असा काढायचा ?
७) माझा महत्वाचा प्रश्न हा की, इतके वर्ष जे चित्रपट संगीत आपण "आपले" म्हणून ऐकतोय, ते संगीत ( चाली नव्हेत ) खरंच आपले संगीत आहे का ?
८) आज काल बरीच गाणी सारखी कानावर पडल्यामुळे आपोआप आवडायला लागतात, लोक ती गुणगुणतात, असा एक सुरही ह्याचर्चेत आला आहे. हाच न्याय, जुन्या संगीताला नाही का ? जवळपास, ३-४ दशके काही विशिष्ठप्रकारचे संगीतच आपल्या कानावर सातत्याने पडते आहे, त्यावेळी ते आवडायला लागणे साहजिक नाही का ?
९) कॅसेट विक्री हा संगीताच्या गुणवत्तेचे प्रमाण मालाही मान्य नाही. कारण बऱ्याचदा मला न आवडणारी ( आपल्यालाही असा अनुभव आलाच असेल ) गाणी भरपूर खपतात. आणि काही न खपणारे अल्बम्स विकत घेतलेत तर त्यात अतिशय दर्जेदार गाणी सापडतात. मग प्रश्न असा पडतो की ही गाणी नक्की कोण विकत घेत ? त्यांना नक्की संगीतातले काय कळते ? आणी मग जो कायदा आजसाठी तोच आधीच्या संगीतासाठी लावला तर ? मग त्या काळी जे जे संगीत "विकले" गेले ते काय फक्त ते संगीत चांगले होते म्हणून विकले गेले का ?
१०) फक्त चित्रपट संगीताबद्दल बोलायचे झाल्यास, हे संगीत नेहमी विकले गेले ह्याला कारण, त्या गाण्यांची "गरज" हेही असू शकते. ८०-९०% हिंदी गाणी, प्रेम, मुलगी, प्रेम भंग ह्या असल्याच विषयांन भोवती फिरतात. त्यामुळे, लोकांनी नक्की काय उचलून धरले आहे ? संगीत, चाली की सहज गाता येण्यासारख्या गाण्याचे बोल ?
माझे एक स्पष्टमत आहे. जर बहुसंख्य भारतीयांना सुरुवातीपासूनच चांगले संगीत कळत असते तर, रिमिक्सतर सोडाच, हिमेशही आज नसता. हे बहुसंख्य तेच आहेत जे आज हिमेश विकत घेता आहेत, ज्यांनी एकेकाळी शं-ज चा "हिंदी ऑकेस्ट्रा" डोक्यावर घेतला होता, मग ज्यांनी आर. डी आणि बप्पि डोक्यावर घेतले होते. ह्यात जुने आणी नवे हा वाद गैरलागू आहे. आणि पाहिलं तर दर्जा दोन्हीकडे अथवा कुठेच नाही.
मयुरेश वैद्य.