तुझं म्हणणं तुझ्या बाजूने खरं असेल. ते कसलाही संकोच न करता मोकळेपणाने मांडल्याबद्दल मी तुझी आभारी आहे.
मला माझ्या लेखनाचं समर्थन करायचं नाही. त्यातून माझं लेखन वाचून वाचकाला काय वाटेल हे मला ठरवता येत नाही.
हा लेख आहे. प्रगटन आहे. कथा किंवा निबंध नाही. तू माझा मित्र म्हणून मला काही प्रश्न विचारले आहेस. त्यांची उत्तरं देण्याचा मी प्रयत्न करते आहे. हे कुठल्याही प्रकारे समर्थन नाही हे कृपया लक्षात घ्यावंस.
लेख विस्कळित आहे असं बऱ्याच जणांचं मत आहे. पण हा लेख जालनिशीचं अर्थात जालावर लिहिलेल्या रोजनिशीचं एक पान म्हणून मी लिहिला होता. रोजनिशी मुद्देसूदच असली पाहिजे असं कुठे असतं त्यामुळे एखाद्या निबंधासारखी ही जालनिशी मुद्देसूदपणे मांडावी असं वाटलं नाही.
एकंदर लिखाणाचा विषय एकाच वेळी एकाच विषयावर बोलणाऱ्या दोन व्यक्तींच्या विचारांमधे आपल्याला किती फरक पडू शकतो / वाटत असतं आपलंच दुःख खरं आणि मोठं पण समोरच्या माणसाच्या दुःखाबद्दल आपल्याला खरंच किती माहिती असते? / आपलं दुःख गाताना ऐकणाऱ्याचा आपण किती प्रमाणात विचार करतो असाही असू शकतो. शिवाय आपल्या मनात खोल दडलेलं काहीतरी आपल्या ध्यानीमनीही नसताना असं अनपेक्षितपणे समोर आलं तर आपली काय प्रतिक्रिया असू शकते याचाही विचार कर. तो क्षण अविस्मरणीय आहे कारण स्वतःला ही कदाचित माहीत नसलेलं पण खोल कुठेतरी अंतर्मनाला कळून चुकलेलं एखादं सत्य त्या क्षणात समोर आलं आहे. हे सत्य संपूर्ण नवीन आहे. धक्का बसण्याजोगं विदारक आहे आणि कदाचित जीवना कलाटणी देणारंही आहे पण निश्चितच सुखावह किंवा मंगलमय नाही. उलट भयचकित करणारं आहे. कदाचित त्या आयुष्याच्या वाळूच्या घड्याळातले बाकी क्षण किती आणि ते कसे व्यतीत करावे लागणार आहेत हे त्या एका क्षणाने पुरतं समोर आलं आहे. मग तो क्षण कसा विसरता येणार आहे? ते संभाषण हे फक्त एक निमित्त असून त्यामुळे वेगळंच काही बाहेर आलं आहे जे येण्याची खात्री आणि अपेक्षा फक्त अंतर्मनालाच होती....
ही एक रोजनिशी असल्यामुळे या घटनांमागची पार्श्वभूमी लिहिणाऱ्याला माहीत आहे आणि ती स्पष्टा करावीशी त्याला वाटत नाही... शिवाय रोजनिशीला एक ठराविक असा अंत / तात्पर्य / विषय नसतो त्यामुळे लिहिणाऱ्याच्या विचारांचा हा आवेग असू शकतो.(अर्थात ही वेब-निशी आहे त्यामुळे तिला पूर्ण पणे रोजनिशी म्हणता येणार नाही..)
तरीही मला लिहिताना हे सगळं जाणवत होतं म्हणून मी लिहिलं. एक नवा प्रयोग म्हणून लिहिलं. माझ्या ब्लॉगवर हे सगळं मला लिहायचं होतं हेही एक कारण आहे यामागे.
(हे सगळं काल्पनिक आहे आणि यातील मुलगी प्रेमात नक्कीच पडलेली नाही या गोष्टी डिस्क्लेमर!)
तुझ्या प्रश्नांचं थोड्याफार प्रमाणात मी उत्तर देऊ शकले का ते नक्की कळव..
--अदिती