कळ्यांची फ़ुलं व्हायचा एक मोसम असतो.ती वसंतात फ़ुलली तर त्यांची शोभा सृष्टिलाही सजवते.मोहर अकाली सुध्दा येतो पण तो फ़लद्रुप होत नाही.या निसर्गाच्या लिला आहेत.तुझ्या माझ्या मिलनाची घडी त्याने आधीच लिहुन ठेवली होती.याला मृगजळ म्हणू नकोस.तृष्णा शांत व्हायला एक थेंब ,पण खराखुरा लाभला हे विसरू नकोस.त्या थेंबानेच तृप्त होऊन हा सुंदर आविष्कार ज्याने घडविला त्या दात्याचे आपण रूणि होऊ.आपलं एकमेकांच अस्तित्व या अत्त्युच्च आनंदाचा एक सुंदर अनुभव आहे. हे सर्वांच्या नशिबात नसतं.तेंव्हा डोळ्यांतली ही अगतिकता विसरून आपण नव्यानं जगू या.आपापल्या क्षितिजावर!'मित्राच्या' आकर्षक रंगसंगतीत एकरूप होऊन......

          अजूनही त्याच्या किरणांत ऊब आहे प्रेमाची.कन्याकुमारीचा सागरतट आजही आपली आठवण काढित असेल,ती व्याकुळ संध्याकाळ अजूनही किनाऱ्यावर मऊशार रेतीत आपली पावलं शोधीत  असेल,मरीनड्राईव्हची दिव्यांची माळ अजुनही आपल्या कौतुक भरल्या नजरेची वाट पहात असेल,किनाऱ्याच्या टोकापर्यंत डोळ्यांच पारणं फ़ेडण्याकरिता....मढ आयलंडची रेश्मी वाळू तशीच चमकत असेल मावळत्याच्या साक्षीनं आपली आठवण काढीत,दुरवर ऐकू येणारी ती स्वरांची  धुंद सुरावट आणि तिच्या तालावर थिरकणाऱ्या आपल्या लयबध्द पावलांची चाहूल आजही तशीच थबकली असेल बघ त्या दिशामंडलात....देहभान हरपविण्यसाठी.....

                 हे सारं इतक्या लवकर विसरू नकोस.......! हेच तर जगण्याचं मर्म आहे. हा कस्तुरीचा गंध आहे.तो मनात भरून घे.दाटून आलेला हुंदका त्यात विरघळून जाऊ देत. ह्या दरवळीत तूझे कासाविशी  श्वास मोकळे होऊ देत,भांबावलेल्या तुझ्या डोळ्यातील पाणी सुगंधीत होऊ दे,ती व्याकुळता या गंधाबरोबर वाहुन जाऊ दे.या उत्कट क्षणी बघ आता आभाळ कसं मोकळं झालंय....तुझ्या माझ्या स्वागतासाठि....चल असे पंखांना फ़ैलावून झेप घेऊया अज्नाताकडे......

शीला