आपल्या मुलाचे नाव अर्थपूर्ण असावे आणि ते त्याने सार्थ करावे अशी पूर्वी लोकांची इच्छा असे आणि त्यात वावगे काही नाही.आता नावाच्या अर्थापेक्षा नावीन्य आणि वैचित्र्य याला महत्व आले आहे असे काही किस्से वाचून वाटते.पण काही नावे बरीच प्रचारात असून त्यांच्या अर्थाकडे पालक का लक्ष देत नाहीत हे कळत नाही.उदा.मंजूषा हे नाव मुलींना आणि अनिकेत हे मुलाला बरेचदा असते पण या दोन शब्दांचे अर्थ अनुक्रमे पिशवी आणि घरदार नसलेला असे आहेत. वैचित्र्य,वेगळेपणा यावरून नावाशी संबंधित नसणारा पण एक मजेशीर किस्सा म्हणून सांगतो. अमेरिकेत चिनी लोकही भरपूर आहेत.त्यामुळे चिनी मुळाक्षरे बऱ्याच ठिकाणी दिसतात.एका भारतीय स्त्रीला कशिदाकामाची फार आवड होती आणि त्यासाठी नव्या नव्या आकृतींच्या(designs) शोधात ती असायची.एकदा काही चिनी अक्षरांची एक आकृती तिला फ़ार आवडली म्हणून तिने मोठ्या हौसेने ती आपल्या कुर्त्याच्या समोरच्या भागावर काढून उत्तम रंगसंगती वापरून रेशमाने भरली आणि तो कुर्ता घालून ती एका पार्टीला गेली.तिच्या काही मैत्रिणींनी त्याचे खूप कौतुक ही केले पण एक चिनी मैत्रीण तिला नन्तर भेटून म्हणाली ,'हे डिझाइन तुला कोठे मिळाले? आणि याचा अर्थ काय आहे माहित आहे का?तिने भाबडेपणाने मान हलवली तेव्हा ती चिनी मैत्रीण म्हणाली,याचा अर्थ आहे केवळ तुमच्यासाठी (only for you)! त्या भारतीय स्त्रीने परत तो कुर्ता घालण्याचे धाडस केले माही.