काही लिहिण्यापुर्वी मी माझे मत स्पष्ट करू इच्छितो.
सामाजिक समतेसाठी आरक्षण आवश्यक आहे, पण ते पूर्णतः आर्थिक निकषांवर असावे असे मला वाटते.
ह्या चर्चेचा प्रस्ताव उपहासात्मक आणि भाषा अनावश्यक वाटली, म्हणून मी माझा वरील प्रतिसाद दिला.
आता काही मुद्द्यांना उत्तरे -
वरील लेखकाच्या वाक्यातील शब्दांवर न जाता आरक्षणाचे खूळ (लेखकच्या दृष्टिकोनातून) आता कुठल्याही थरालाही पोहोचू शकते हा भावार्थ लक्षात घ्यावा.
भावार्थ असो वा आणखी कुठलाही अर्थ, हे वाक्य चीड आणणारे आहे हे आपण मान्य करता की नाही? आपण आपले मित्र कांबळी यांचे उदाहरण दिलेत, आता मी असे विचारतो, हा मुद्दा आपण त्यांच्याबरोबर अशा पद्धतीने चर्चाल काय? ते त्यांना अपमानास्पद वाटणार नाही ?
पण मागासवर्गीयांतून सार्वजनिकरीत्या आरक्षणाला विरोध करणारी चळवळ उभी राहिलेली दिसत नाही. मागासवर्गीय विचारवंत (त्यांच्यातही आहेत हा माझा विश्वास आहे) मागासवर्गीयांचे प्रबोधन करताना दिसत नाहीत.
हा हा हा. अहो, उच्चवर्णीयांतील विचारवंत तरी कुठे आरक्षणविरोधी चळवळ करत आहेत? मला महाराष्ट्रातले कोणतेही (मागासवर्गीय किंवा उच्चवर्णीय) विचारवंत दाखवून द्या ज्यांनी आरक्षणविरोधी एक ठाम भूमिका घेतलेली आहे. एकूनच महाराष्ट्रात आज 'कठोर,खडे बोल' सुणावणारे, कोणत्याही कठीणसमयी निःपक्षपाती पद्धतीने आपली भूमिका मांडणारे, आगरकरांसारखे कोणी विचारवंत उरलेले आहेत की नाही अशीच मला शंका येते.
का? सवलत ही भीक असते का? चुकीचा शब्दच्छल करू नका.
नाही, सवलत ही भीक नसते, पण आपण दिलेले उदाहरण चुकीचे आहे. मागासवर्गीय खरेदीत सवलत कशी मागतील? याच न्यायाने 'हे मागासवर्गीय लोक उद्या आम्हाला आयतेच खायला द्या असे म्हणतील' असाही युक्तिवाद तुम्ही कराल, पण असं मागासवर्गीय कधीच म्हणणार नाहीत. इथे लक्षात घेणे आवश्यक आहे की आम्हाला आयत्या पदव्याच द्या अशी मागासवर्गीयांची मागणी नाही, तर ह्या पदव्या मिळवण्याची एक संधी मिळावी अशी त्यांची मागणी आहे. जे गरीब आहेत,ज्यांना वर्षानुवर्षे संध्या नाकारल्या गेल्या, त्यांना काही बनण्याची संधी द्या, मग जो पैसा ते कमावतील त्याने ते हव्या त्या वस्तू इतरांप्रमाणेच खरीदतील, तिथे त्यांना सूट नको. फक्त गरीब असल्यामुळे काही बनून दाखवण्याची (नि नंतर हवे ते खरीदण्याची) त्यांची संधी तुम्ही हिरावून घेऊ नका एवढेच आम्ही म्हणतो.
'लेले, पटवर्धन आणि गोखले जेंव्हा चतुर्थश्रेणीत येतील आणि ऑफिसात झाडू मारताना दिसतील तेंव्हाच आमच्या आत्म्याला शांती लाभेल' हे वाक्य म्युन्सिपालटीच्या कचेरीत काम करणाऱ्या मागासवर्गीय चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या युनियन लीडरचे आहे. त्यावर बाकीच्या उपस्थित मागासवर्गीय चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी जोरदार हसून त्याचे समर्थन केले होते.
वरूणगावकर नांवाच्या एका चित्रकाराच्या घरी जाण्याचा प्रसंग आला होता. खरं पाहता मला वेळ नव्हता. पण कलाकारांचा मी आदर करतो आणि एका चित्रकाराला भेटण्याची संधी हातची सोडायची नाही म्हणून मित्रा बरोबर त्याच्या (चित्रकाराच्या) चाळीतील खोलीवर गेलो होतो. दरवाज्यातच मित्राने माझी ओळख करून दिली. त्यावर, 'अंऽऽ पेठकर? म्हणजे by caste?' असा प्रश्न त्याने विचारला. लक्षात घ्या. दरवाज्यात. मी 'ब्राह्मण' असे सांगितल्यावर त्याने माझ्या कडे एक तुच्छ कटाक्ष टाकून अत्यंत नाईलाजाने (त्याला मित्राकडून काम हवे होते) मला घरात घेतले.
ही उदाहरणे आपण दिलीत खरी, पण त्यांचे प्रयोजन कळले नाही. आपण दोन उदाहरणे दिलीत, मी याविरुद्ध दोनशे देऊ शकतो. परंतु, हा म्हणजे एकाने गाय मारली तेव्हा दुसऱ्याने वासरू मारण्याचाच प्रकार झाला. समाजात बंधुभाव वाढावा, जातीजातींमधली तेढ कमी व्हावी, आपण सगळे एक व्हावोत असे आपल्याला वाटते ना? मग अशी उदाहरणे देऊन काय होणार? त्यामुळे उलटाच परिणाम होईल असे वाटते.
पण मागासवर्गीय गट एकत्र येऊन आरक्षण विरोधी चळवळ का चालवत नाहीत? सवलतीचे जातीय निकष बदला असे सरकारला ठणकावून का सांगत नाहीत? आर्थिकदृष्ट्या अत्यंत सबल असणाऱ्या परंतु जातीच्या आधारावर सवलतींचा फायदा उठविणाऱ्या मागासवर्गीय बांधवांविरद्ध आवाज का उठवत नाहीत?
हम्म्म. पण याचा अर्थ मागासवर्गीय लोकांचा आरक्षणास पाठिंबा आहे असा आपण कसा काढलात? आता देशभरात जी निदर्शने झाली त्यात मागासवर्गीय लोक नव्हतेच हे आपण ठणकावून सांगू शकता काय?
कांबळी नांवाचा माझा एक, इयत्ता ५वी पासूनचा मित्र, आज तागायत मित्र आहे. हा मागसवर्गीय आहे हे माहीत आहे म्हणून त्याचे नांव दिले. बाकी असे अनेक मित्र आहेत की ज्यांची जात कुठली हे माहीतही नाही. मी 'गुणवत्ता' पाहूनच मैत्री करतो. आडनांव आणि जात पाहून नाही.
हम्म्म. यासाठी आपले अभिनंदन. आता माझा एकच प्रश्न आहे, वरील चर्चेतील भाषा वापरून आपण आपल्या मित्रांबरोबर अशीच चर्चा केली असती काय?
असो, आता आणखी युक्तिवाद करत बसत नाही.
आरक्षणावर अनेक चर्चा मनोगतावर चालू आहेत, तिथे जाऊन मत मांडता येणे शक्य असतानाही मागासवर्गीयांचा उपहास करणारी चर्चा सुरू करणे आवश्यक नव्हते असे मला वाटले, म्हणून वरील प्रतिसाद मी दिला. माझ्यापुरता हा विषय मी संपवला आहे.
कलोअ,
एक वात्रट