धांदरटपणा कुठलेही समर्थन न करता मान्य केला तर फारच लोभसवाणा वाटतो. त्यातून होणारे नुकसान तसे फार मोठे नसते. परंतु, जे विनोद निर्माण होतात त्यातून जे खळखळते हास्य फुलते त्याचा फायदा फारच मोठा असतो.
धांदरटपणाचे 'वरदान' बायकांना असते असे माझे आज पर्यंतचे निरीक्षण आहे.
माझी पत्नी विशेष धांदरट नसली तरी तिने एकदा घराची किल्ली फ्रीज मध्ये ठेवून दिली आणि शोधाशोध करण्यात बराच अमूल्य वेळ खर्च झाला. शेवटी दुसऱ्या किल्लीने दार बंद करून बाहेर पडलो. दुसऱ्या दिवशी सकाळी दूध तापविण्यासाठी फ्रीज बाहेर काढावे म्हणून फ्रीज उघडला आणि थंडीत कुडकुडणारी किल्ली समोर दिसली.
धांदरटपणाचे 'वरदान' बायकांना लाभलेले असते असे विधान वर केलेले असले तरी माझा एक मित्र बायकांच्याही वरताण धांदरट आहे. दोन पायात वेगवेगळ्या रंगांचे मोजे घालून ऑफिसला जाणे ह्या 'मोस्ट कॉमन' धांदरटपणा पासून बाहेरून घरी परतल्यावर कारमध्येच झोपलेल्या आपल्या मुलाला घरात आणायचे विसरून जाणे आणि दात वगैरे घासून झोपताना (सुमारे अर्ध्या तासाने) पतिपत्नी दोघांनाही मुलाची आठवण होऊन धावत पळत कार मधून मुलाला आणणे असा उच्च दर्जाचा धांदरटपणाही त्याच्या खात्यावर जमा आहे.
एकदा त्याच्या घरी गेलो असता तो पकड-पान्हा घेऊन वॉश बेसिनखालील बॉटलट्रॅप उघडून त्यातील घाण चिवडत बाथरुम मघ्ये बसला होता. 'शीऽऽऽ हे काय चाललंय?' ह्या माझ्या प्रश्नावर 'तोंड धुताना डोळ्यातील काँटॅक्ट लेन्स काढायची विसरलो, एक वाहून गेली, ती शोधतोय. ये तू ही शोध.' असे उत्तर मिळाले. नाईलाजाने, मित्रकर्तव्य म्हणून मी त्या घाणीत हात घालणार एवढ्यात त्यालाच ती लेन्स मिळाली आणि माझे किळसवाणे श्रम वाचले.
माझ्या एका मैत्रिणीने घरी आलेल्या पाहुण्यांसाठी साखरे ऐवजी मीठ घातलेला चहा बनविला होता.
कोणी जेवायला येणार असेल आणि मी, पत्नीच्या सहकार्यावाचून, स्वयपांकघरात काही बनवीत असेन तर, सांड-लवंड फार सांभाळतो. फोडणी साठी ताटलीत काढून ठेवलेली मिरी, लवंग, मोहरी, जिरे, वेलची हमखास धक्का लागून स्वयंपाकघरभर पसरते. काळी मिरी तर अशी रानोमाळ होते की नंतरचे २-४ तास कुठे-कुठे पायाखाली येत असते.
मस्कतमध्ये बॅचलर म्हणून राहत असताना एकदा माझा दुसराच एक (मल्याळी) मित्र गॅसवर भात ठेवून घर बंद करून ८ वाजता ऑफिसला आला होता. १०वाजता इमारती खालील दुकानदाराचा 'तुमच्या स्वयपांक घरातून धूर येतो आहे आणि घरात कोणी नाही.' असा फोन आल्यावर तो घरी धावला होता. दार उघडले तर घर धुराने भरले होते. स्वयंपाकघरात गॅस चालू होता, भांड्यातील पाणी आटून, भाताचा कोळसा होऊन, पातेल्याचा तळ लाल झाला होता. घर वाचले.
धांदरटपणाचे 'वरदान' बायकांना लाभलेले असते असे विधान वर करून उदाहरणे पुरुषांचीच जास्त दिली आहेत. ह्याला 'स्वजातीय विनोद' म्हणावे काय?