सर्वप्रथम उत्तर देतो - "पोर"
प्रात्यक्षिक -
तो पोर - नंदाचा पोर, पाटलाचा पोर, भाबडा पोर आहे, जिवाचं बरं-वाईट करून घ्यायचा एखाद वेळी (हा वापर सध्या काहीसा अप्रचलित वाटतो)
ती पोर - कशी झोकात चालली कोळ्याची पोर (आभार - महेश)
ते पोर - लहानगे पोर रडू लागले
हे दोन्ही वापर अनेकवचनात जास्त प्रचलित आहेत - त्या पोरी आणि ती पोरं हे प्रयोग बोलण्यात जास्त येतात.
(शीर्षकाचा उलगडा झाला का आता?)
आता उरलेसुरले खुलासे -
१. बऱ्याच लोकांनी "किरण" हे उत्तर दिले. तो किरण (अनेकवचनः ते किरण) व तें किरण (अनेकवचनः तीं किरणे) हे दोन्ही मला स्वीकारण्याजोगे वाटले. पण ती किरण हे विशेषनाम सध्या रूढ असले तरी काटेकोरपणे विचार करता पटले नाही, किरणमयी किंवा तत्सम नावाचे संक्षिप्त रूप वाटले. विशेषनाम हे अर्थबोध होण्याच्या दृष्टीने पु. किंवा स्त्री. याऐकी एकच असू शकते असे माझे मत आहे त्यामुळे हे उत्तर मी स्वीकारले नाही..
२. काही लोकांच्या मते ते हे सर्वनाम वापरले गेले की नपुंसकलिंग झाले. हे चुकीचे आहे. तो(पु.) चे अनेकवचन ते (जुन्यापद्धतीने अनुस्वाररहित) आणि ते(नपु.) चे अनेकवचन तीं (दोन्ही जुन्यापद्धतीने अनुस्वारयुक्त). या दोन ते व तें मध्ये घोटाळा केल्यामुळे असा समज झाला. हल्लीच्या शुद्धलेखनात अनुच्चारित अनुस्वार गाळले जातात त्यामुळे हा संदिग्धपणा येतो/राहून जातो. जुन्या शुद्धलेखनात अचूकता असल्यामुळे इतरांना अवघड वाटले तरी माझ्यासारख्या लोकांना तेच आवडत असे.
आता "मावळ्यांची घोडी दौडत होती" म्हणजे एक की अनेक घोडी ते कळत नाही, असो.
शेवटी उदंड प्रतिसादाबद्दल सर्वांना धन्यवाद. महेश हे (एकमेव) विजेते ठरले, त्यांचा मनोगतावरील विचक्षण वावर पहाता ते मला काहीसे अपेक्षितही होते.
बरंय, असाच लोभ असू द्यावा ही विनंती.
दिगम्भा