'पहिली डेट' चे वर्णन खूप सुंदर आहे. विरोधाभासाचा वापर चांगल्या प्रकारे केला आहे.

मला खटकलेल्या/रुचलेल्या काही गोष्टीः

नुकतंच वयात आलेलं ते चाफ्याचं झाड पुलाच्या अगदी सुरुवातीलाच आहे. हे सुरुवातीचे वाक्य, त्या नंतर येणाऱ्या वर्णनातील भावनेशी एकरूप होणारे आहे. मात्र त्या नंतर लगेच, कमरेत वाकल्याने हि शब्दयोजना वार्धक्याच्या खुणा सुचविते म्हणून पुढील भावनेशी विसंगत वाटते.

पुलाच्या पलिकडे पेटलेली गुलमोहराच्या झाडाची रांग.
सुटे वाक्य चांगले आहे. पण पुन्हा पुढील वर्णनातील भावुक संवेदनांशी विसंगत वाटते.  

रंग उडालेले पुलाचे कठडे. हे वास्तव वर्णन टाळता आले असते. परंतु, ह्या वास्तवाचा वापरही शेवटच्या परिच्छेदात प्रेम-भावनेला पोषक शब्दात करता आला असता. तो तसा न केल्याने हे वाक्य अनावश्यक होते.

आणि ती मात्र, जणु काही मी तिथे आलो नसतो तरी तिने ती संध्याकाळ मजेत घालवली असती अशा थाटात मला "Re:Hi" म्हणाली.
का इतका रुक्षपणा? तिचे व्यक्तीचित्र जे नंतरच्या संभाषणातून (एकतर्फी) उभे केले आहे, त्याशी हे वागणे फटकून आहे. त्यामुळे पटत नाही.

...आणि तिला मी तिच्यासाठी आणलेली फुलं देताच ती म्हणाली, 'आज चंद्र किती छान दिसतोय'....!!
हेही अनैसर्गिक आहे. इतक्या दूरच्या चंद्राच्या सौंदर्यात हरवणारी नायिका हातातल्या फुलांच्या आणि त्या देणाऱ्या प्रियकराच्या भावनांच्या सौंदर्याकडे दुर्लक्ष करेल असे वाटत नाही.

मी तिच्याकडे पाहिलं आणि तिने झर्रकन आपली मान दुसरीकडे वळवली.
हलकेच लाजून दुसरीकडे वळविली, जास्त समर्पक वाटले असते.

त्या संध्याकाळी त्या शांत वातावरणात ऐकताना मला पहिल्यांदा समजलं की, गाण्या-वाजवणाशिवायही कधी कधी संगीत निर्माण होतं...एक असं संगीत की, जे तुम्हाला तुमच्या सर्व कक्षा ओलांडून दूर कुठेतरी नेतं.
नितांत सुंदर वाक्य.
'गाण्या-वाजविण्याशिवायही' पेक्षा 'वाद्ये आणि गीताच्या बोलांच्या अनुपस्थितीतही' जास्त 'संगीतमय' वाटले असते.

माझं शांत राहणं आता तिला ऐकू गेलं असावं.
व्वा. सुंदर.

राखेच्या ढिगा-यात पडलेल्या निखा-यांप्रमाणे त्या रात्रीच्या अंधारात गुडूप झालेली गुलमोहराच्या झाडांची रांग
'राखेच्या ढिगाऱ्यात पडलेले निखारे' प्रेमभावनेत समरस होत नाहीत.

हळूहळू डोकं वर काढत लुकलुकणा-या चांदण्या आणि त्या चिमुकल्या दिसणा-या असंख्य स्वयंप्रकाशित तारकांवर अधिपत्य गाजविणारा तो रुबाबदार उपग्रह
लुकलुकणाऱ्या चांदण्या आणि स्वयंप्रकाशित तारकांमध्ये 'चंद्र'च शोभून दिसला असता. 'उपग्रह' नाही.

दिवस आणि रात्र यांना जोडून तिथून हळूच सटकलेली ती संध्याकाळ आणि ह्या प्रचंड सृष्टिचित्रात दोन जीवांच्या ठिपक्यांना एकत्र जोडणारा,रंग उडालेल्या कठड्यांचा तो पूल.........हे सारे आम्हा दोघांना एका शांत सुरात विनवत होते -
पुल, दोन किनारे जोडण्याचे काम करतो हे मान्य. पण, दोघेही 'पहिल्या डेट' वर आले आहेत, म्हणजे मने जुळण्याचे काम आधीच झाले आहे. इथे एकत्र जोडणारा ह्या शब्दरचनेपेक्षा, दोघांच्या जीवनात प्तरंगांची उधळंण करणारा रंग उडालेल्या कठड्यांचा पूल अशी वाक्यरचना शोभूनही दिसली असती आणि संपूर्ण वर्णनात वापरलेल्या 'विरोधाभासा'च्या शैलीतही चपखल बसली असती.

कवितेत ऱ्हस्व-दीर्घ माफ असतात पण गद्यात नाही. शुद्धिचिकित्सकाची एवढी सुंदर सुविधा उपलब्ध आहे, तिचा वापर करावा, ही विनंती.