इतक्या स्पष्ट सूचनांची पुण्यात नितांत गरज भासते असे आढळून आले आहे. रस्त्याच्या मध्यभागी उभे राहून गप्पा मारणे, दुकानांच्या पाट्या निरखणे, इत्यादी उद्योग पुणेकर जन्मसिद्ध हक्काने करतात. हॉर्न वाजविल्याखेरीज अजिबात बाजूला होत नाहीत. हॉर्न वाजविल्यावरही 'काय हा मेला वाहनांचा त्रास! रस्त्याच्या मध्यभागीही धड उभे राहू देत नाहीत.' असा, वाहन चालकावर, दृष्टिक्षेप टाकून मोठ्या मुश्किलीने (सावकाऽऽऽश) बाजूला होतात. वाहनचालकाला (तो पुण्यात मुरलेला नसेल तर) मेल्याहून मेल्यासारखे होते.