नवीनराव,
ह्या अतिशय उद्बोधक सर्वेक्षणाचा दुवा इथे दिलात त्याबद्दल आपले आभार.
आत्मपरीक्षण करण्यासारख्या बर्याच गोष्टी त्यात आहेत हे तर खरेच. पण मराठी माणसाने न्यूनगंड बाळगावा इतके वाईट त्यात काही नाही हेही नमूद करावेसे वाटते.
विशेषतः त्या लेखातील मराठी माणसाबद्दलची अमराठी लोकांची काही चांगली निरीक्षणे इथे उतरवून ठेवावी असे वाटते -
"थोडक्या शब्दांत रोखठोक म्हणणं, शब्दांची उधळमाधळ नाही."
"देवाला घाबरतात. थोडे अध्यात्मिक असतात. धंद्यासाठी आम्ही हेराफेरी, झूठ,स्मगलिंग काय वाटेल ते करू. हे लोक यातलं काही करणार नाहीत."
"रीत बरोबर असली पाहिजे. भावनेचा मुद्दा नंतर."
"घर सांभाळतील, मुलांचा अभ्यास घेतील, स्वयंपाक रांधतील, नोकरीही करतील. इतर समाजातल्या बायका असे दुहेरी कष्ट नाही उपसणार. मला वाटतं हे सगळं चोखपणे करायला आयुष्याबद्दलची धारणा मुळात खूप पक्की असावी लागते."
"मराठी मोलकरीणही लाचार नाही वाटत."
"मराठी माणसाला चांगली विनोदबुद्धी आहे."
अशी काही वाक्ये सोडली तर लेखात सर्वत्र अमराठी लोकांना मराठी माणसांतले कोणते गुण आवडत नाहीत त्याचे निवेदन आहे. त्यातील काही गोष्टी आपण जरूर सुधारणेस वाव म्हणून लक्षात घ्याव्या. उदा० आपले गाव सोडून इतरत्र जाऊन राहायची अनिच्छा-
"मराठी माणसाची असुरक्षितता खूप गहिरी आहे. कारण तो स्वतः उठून कुठंच जात नाही."
ह्यात अलिकडे बरीच सुधारणा होते आहेच. पण लेखातील सगळ्याच गोष्टी काही गांभीर्याने घ्यायची आवश्यकता नाही असे वाटते. उदा०
"माधुरी दीक्षित श्रीराम नेनेशीच लग्न करते तेव्हा मला ती पक्की मराठी वाटते. बदलाकडे संधी म्हणून बघायला मराठी मनोवृत्ती तयार होत नाही."
नाहीतर मराठी आणि अमराठी माणसांत फरकच राहणार नाही.
"आपल्याला कोणी काहीही म्हणो आपण अंगाला लावून घेत नाही. आपलीच संस्कृती महान हे आपण ठोकून, ठरवून टाकलेलं आहे."
शेवटी 'आहे हे असे आहे'!
आपला
(आत्मकेंद्रित) प्रवासी