सर्वांनी केलेल्या कौतुकाबद्दल व दिलेल्या उत्तेजनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
मी मनोगतावर नवा आहे. लेखनाचा अनुभवही फारसा नाही. या परिस्थितीत जुन्या मनोगतींनी घेतलेली दखल माझ्यासाठी बहुमोल आणि उत्साहवर्धक आहे. तरीसुद्धा असल्या नवशिक्याला लेखनाची स्फूर्ती येण्यासाठी वाट पहाबी लागते व आपणा बहुतेकांइतक्या वेगाने लिखाण करता येईल याचा अजिबात भरवसा वाटत नाही ही नोंद येथे करणे भाग आहे.
भैरवीविषयी विनायक यांनी दिल्याप्रमाणे घोटाळे का होत असावेत याचे एक कारण सुचते. ठोकळ मानाने बोलायचे तर (सप्तकात) बारा स्वर असतात - सारेगमपधनी ७ शुद्ध + रेग धनी ४ कोमल + म १ तीव्र. बहुतेक रागांत यातले काही असतात तर उरलेले नसतात. त्यामुळे कोणते स्वर एखाद्या रचनेत आहेत हे पाहून बरेच वेळा रागाचा अंदाज करता येतो. पण भैरवी रागात बाराही स्वर असतात, त्यामुळे अनिर्बंधपणे कुठलेही स्वर घेऊन गाणे गायिले तर ते भैरवीत असल्याचा दावा एखादा गायक करू शकेल. अर्थात फक्त स्वर वाटेल तसे जोडून राग होतो या समजुतीचा आधार घेऊन असा अडाणी दावा करणाऱ्याला तात्यांकडून मोजून जोडे खावे लागतील.
खऱ्या भैरवीचा रस वेगळाच असतो. मैफ़िलीत सर्वात शेवटी भैरवी गायिली जाते. कारण भैरवीने मैफ़िलीला पूर्णता येते, उरल्यासुरल्याची भरपाई होऊन परिपूर्ती होते अशी मान्यता आहे. भैरवीच्या या पूर्णत्वभावामुळे बहुधा ती एखाद्या ईशशरणता किंवा ईशलीनता व्यक्त करणाऱ्या गीताच्या स्वरूपात दिसते आणि सर्वांना पटते.
माझ्या मते हिंदी चित्रपटगीतात "नाचे मन मोरा मगन तिकदा धीगी धीगी" ही एक असा रस दाखवणारी चांगली भैरवी आहे (आणखीही असतील).
पुन्हा एकदा सर्वांचे आभार.
दिगम्भा