अतिरेक्यांचा सुळसुळाट वाढला आहे हे पोलिसांचे निरिक्षण आणि सतर्कता यामुळेच भवितव्य सुरक्षित राहण्याची शक्यता!

नागपूर- संघ मुख्यालयावरील हल्ल्याचा डाव उधळला, ३ अतिरेकी ठार


नागपूर, १: आज पहाटे चार वाजता तीन सशस्त्र अतिरेक्‍यांचा संघाच्या मुख्यालयात घातपात घडवून आणण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत हे तिनही अतिरेकी जागीच ठार झाले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख के सी सुदर्शन यावेळेस मुख्यालयात नव्हते. पोलिस उपानिरीक्षकांच्या वेषात लाल दिव्याच्या पांढऱ्या अँम्बेसिडर गाडीतून आलेल्या अतिरेक्‍यांनी मुख्यालयाच्या प्रवेशद्वारापाशी घालण्यात आलेला अडसर ओलांडून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी प्रवेशद्वारापासून २०० मीटर अंतरावर ही गाडी अडवल्यावर आत बसलेल्या अतिरेक्‍यांनी एके ५६ रायफलमधून गोळीबार करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात हे तिनही अतिरेकी जागीच ठार झाले. या चकमकीत दोन पोलिस अधिकारी जखमी झाले आहेत, असे शहर पोलिस आयुक्त एस पी एस यादव यांनी सांगितले. जखमींपैकी एकाची अवस्था गंभीर आहे.
अतिरेकयांजवळून एके ५६ रायफली, मोठ्या प्रमाणावर आरडीएक्‍स, १२ हातबॉंब हस्तगत करण्यात आले आहेत.
या तिनही अतिरेक्‍यांची अद्यापही ओळख पटू शकलेली नसून त्यांचा लष्करे तैयबा या अतिरेकी संघटनेशी संबंध असावा अशी शक्‍यता वर्तविण्यात आली आहे.