१. अमेरिकन नागरिकत्व अमेरिकन सरकार कोणालाही आपण होऊन बहाल करीत नाही. त्यासाठी अर्ज करावा लागतो. (याचा गुण असण्यानसण्याशी काहीही संबंध नाही.)
अपवाद:
- तुमचा जन्म अमेरिकेत झाला असेल तर. (या स्थितीत तुम्ही आपोआप अमेरिकन नागरिक ठरता.)
- तुमचा जन्म अमेरिकेबाहेर झाला असल्यास तुमच्या आईवडिलांपैकी कोणीही एक जर तुमच्या जन्माच्या वेळी अमेरिकन नागरिक असेल व तुमच्या जन्माअगोदरच्या काळात कधीतरी काही ठराविक वर्षे अमेरिकेत त्यांनी वास्तव्य केले असेल, तर तुमची नोंदणी अमेरिकन नागरिक म्हणून होऊ शकते.
- एका नव्या कायद्यानुसार काही परिस्थितींत अमेरिकन नागरिकांच्या परदेशस्थित दत्तक मुलांकरिता किंवा एखाद्या व्यक्तीच्या आईवडिलांपैकी कोणी त्या व्यक्तीच्या जन्मानंतर अमेरिकन नागरिक झाल्यास आपोआप अमेरिकन नागरिकत्वाची तरतूद आहे असे दिसते, परंतु त्यासाठी तुम्ही १८ वर्षांखालील व अविवाहित असण्याची आणि (अमेरिकन नागरिकांची दत्तक मुले वगळता) अमेरिकेचे स्थायी रहिवासी (पर्मनंट रेसिडेंट अर्थात ग्रीन कार्ड होल्डर) असण्याची अट आहे.
- विशिष्ट गुणवंतांसाठी विशेष कायद्याने अमेरिकेचे सन्माननीय नागरिकत्व बहाल करण्याची तरतूद आहे, परंतु आजतागायत असे सन्माननीय नागरिकत्व फक्त ६ जणांना बहाल करण्यात आले आहे. (असे नागरिकत्व फक्त नाममात्र असावे असे वाटते. सन्माननीय नागरिकत्वधारकांना अमेरिकन पासपोर्ट मिळण्याचा हक्क नाही. नागरिकत्वाचे इतरही हक्क नसावेत, असे वाटते. विन्स्टन चर्चिल व मदर तेरेसा यांचे अपवाद वगळल्यास बहुतांशी असे नागरिकत्व मरणोत्तर बहाल करण्यात आले आहे.)
२. आपोआप अमेरिकन नागरिक नसलेल्यांना नागरिकीकरणासाठी अर्ज करण्यासाठीसुद्धा काही किमान अटी आहेत. अर्जदाराच्या नावावर जगात कोठेही गुन्ह्याची नोंद (क्रिमिनल रेकॉर्ड) नसणे वगैरेंसारख्या सामान्य अटी वगळल्यास यातील मुख्य अट स्थायी रहिवासी म्हणून अमेरिकेतील किमान वास्तव्यासंबंधी आहे.
- अर्ज करण्यापूर्वी किमान पाच वर्षे अमेरिकेत स्थायी रहिवासी स्थितीत (पर्मनंट रेसिडेंट स्टेटसमध्ये अर्थात ग्रीन कार्ड मिळाल्यानंतर) सलग वास्तव्य. (या पाच वर्षांच्या काळात कधीही अमेरिकेबाहेर एका वेळी सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी बाहेर गेल्यास या नियमाचा/वास्तव्याच्या सलगतेचा सहसा भंग होत नाही, परंतु त्या परिस्थितीत या पाच वर्षांच्या कालावधीत एकूण किमान तीस महिने अमेरिकेत उपस्थित असणे आवश्यक आहे.)
- फक्त दोन परिस्थितीत या किमान वास्तव्याच्या कालावधीच्या अटीत थोडी सूट मिळू शकते: (१) अमेरिकन नागरिकाशी विवाहबद्ध आणि सहचारी असल्यास (मॅरीड टू अँड लिव्हिंग विथ): पाच वर्षांऐवजी तीन वर्षे, किंवा (२) अमेरिकन सैनिक अथवा माजी अमेरिकन सैनिक असल्यास: काही परिस्थितीत पूर्ण सूट; सैन्यातील सेवेचा काळ आणि सैन्यातून मुक्ती (डिस्चार्ज) नंतर लोटलेला कालावधी यावर सूट अवलंबून.
संदर्भ: दुवा, दुवा, दुवा, दुवा
आपण अमेरिकेत सहा वर्षे राहिला म्हणता. आपण नागरिकत्वासाठी अर्ज करण्यासाठी पात्र होतात असे जरी मानले, तरी याचा अर्थ तुम्ही पाच वर्षे स्थायी रहिवासी (ग्रीन कार्ड होल्डर) होता, असे मानावे लागेल. (आपली प्रखर भारतीय राष्ट्रीयत्वभावना लक्षात घेता १. आपण एखाद्या अमेरिकन नागरिकाबरोबर विवाहबद्ध असणे, अथवा २. आपण अमेरिकन सैन्यात भरती होणे, यांपैकी काही शक्य आहे असे वाटत नाही.) आपण नोकरीनिमित्ताने अमेरिकेत राहिलात याचा अर्थ आपण आपले स्थायी रहिवासित्व (पर्मनंट रेसिडेन्स / ग्रीन कार्ड) आपल्या नोकरीच्या जागे मार्फत मिळवलेत असे मी धरतो. नोकरीच्या जागेमार्फत स्थायी रहिवासित्वाचा अर्ज हा सहसा अमेरिकेत (नोकरीपरवाना अर्थात एच-१-बी अथवा इतर स्थितीत) आल्यानंतर केला जातो. या प्रक्रियेस खूप वेळ लागू शकतो, आणि कोठल्याही 'कॅटेगरी'खाली (मराठी प्रतिशब्द?) ही प्रक्रिया एका वर्षात पूर्ण होऊ शकत नाही. तेव्हा आपण सहा वर्षे अमेरिकेत राहिला असल्यास त्यापैकी पाच वर्षे स्थायी रहिवासी म्हणून राहिले असणे शक्य नाही.
तस्मात्, आपल्या अमेरिकन नागरिकत्व 'नाकारण्याच्या' दाव्यात काहीही तथ्य दिसत नाही.
- टग्या.