सदर चर्चेत दोन प्रकारची विस्तृत सरसकटीकरणे (ब्रॉड जनरलायझेशन्स) दिसून येत आहे.

१. मातृभूमीपासून लांब राहणारे मातृभूमीची काहीच सेवा करत नाहीत पर्यायाने ते मातृभूमीशी प्रतारणा करत आहेत.

२. मातृभूमीतच राहणारे हे परम देशभक्त आहेत आणि ते सातत्याने मातृभूमीची सेवा करत असतात.

पहिले विस्तृत सरसकटीकरण मोडणारी लाखो उदाहरणे देता येतील तर दुसरे मोडणारी कोट्यवधी. त्यामुळे ही दोन विस्तृत सरसकटीकरणे ही सुयोग्य गृहीतके आहेत असे मानून कोणी कितीही प्रगल्भ विचार मांडले तरी त्यातला फोलपणा ती 'प्रगल्भ' व्यक्ती स्वतःही जाणून असेल असे वाटते.

===

देशातील व्यक्तींनी दुसऱ्या देशात जाऊन बस्तान बसवणे हे त्यांच्या मातृभूमीसाठी फायद्याचे ठरले आहे. याची अनेक उदाहरणे इतिहासात आहेत. पण इतिहास कशाला वर्तमानात पाहा.

चीनची आर्थिक प्रगती-
चीनची गेल्या दोन-तीन दशकांत जी आर्थिक प्रगती झाली आहे त्याच्या अनेक आधारस्तंभांपैकी एक या चर्चेच्या दृष्टीने महत्वाचा आहे असे वाटते. तो म्हणजे चीनचे परदेशस्थ नागरिक... जे आपल्या देशात एकतर परत गेले आहेत किंवा ये-जा करत आहेत. त्यांनी त्यांच्या मातृभूमीला पैसा, तंत्रज्ञान आणि बाजार हे तीनही मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

अमेरिकेचे इस्त्राईल प्रेम-
याचे मुख्य कारण म्हणजे ज्यूंनी या अमेरिकेतल्या सत्तेचा घेतलेला अप्रत्यक्ष ताबा आहे असे वाटते. बँका, वित्तसंस्था, नावाजलेल्या वकीली कंपन्या, सरकारी संस्थांतून ज्यूंचा अक्षरशः सुळसुळाट झाला आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. आणि सत्ता ही संपत्तीची बटीक असते हे सांगणे न लगे.

===

परकीय चलन-
परदेशस्थ नागरिकांची पहिली पिढी हे कोणत्याही देशासाठी परकीय चलन मिळवण्याचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग आहे असे वाटते. कारण या परदेशस्थ नागरिकांच्या पहिल्या पिढीची पाळे-मुळे (सामान्यतः आई वडील आणि इतर नातेवाईक) मातृभूमीतच असतात. त्यांच्या मनातली मातृभूमीची ओढ साक्षात ब्रम्हदेवही पुसून टाकू शकत नाही असे वाटते. त्यामुळे ज्याच्यात्याच्या ऐपतीप्रमाणे आणि प्रेमाप्रमाणे प्रत्येकजण आपल्या 'घरी'(विस्तृत अर्थाने) काही ना काही पाठवत असतोच. हे परकीय चलन मूळ देशाला अक्षरशः फुकट मिळत असते असे वाटते. एकूण जागतिक अर्थव्यवस्था बघता आणि सामान्यतः माणसाचा ओढा कमी प्रगत प्रदेशाकडून जास्ती प्रगत प्रदेशाकडे जाण्याचा असतो. चलनाच्या भाषेत बोलायचे झाले तर (सामान्यतः) स्वस्त चलनाकडून (उदा० भारतीत रुपया) महाग चलनाकडे (उदा० अमेरिकी डॉलर, युरो, दिनार इ.इ.) असतो असे म्हणता येईल. त्यामुळे परदेशस्थ नागरिकांची मूळ देशात पैसा पाठवण्याची क्षमता जास्ती असते असते वाटते. त्यामुळे त्यांच्या वार्षिक उत्पन्नाच्या काही टक्के रक्कम सुद्धा त्यांची मूळदेशातली अनुपस्थिती भरून काढण्याइतकी मोठी असू शकते. (याच कारणाने जेंव्हा भारतभू श्रीमंत होती तेंव्हा परदेशी लोकांना भारतात येण्याबद्दल प्रचंड आकर्षण आणि उत्साह होता असे वाटते.)

परदेशस्थ लोकांच्या भारतीय बँकांतल्या ठेवी-
हा देशाची अर्थव्यवस्थेत भर घालणारा आणखी एक भाग. यामुळे भारतीय बँकांना लाखो-करोडो रुपयांच्या ठेवी मिळतात. या ठेवी त्याच बँका भारतात कर्जवाटपासाठी वापरात. या ठेवीतल्या मिळकतीवर (साधारण ३०%) करही सरकारला मिळतो.

भारतात कमाई करणारे सगळेचजण देशाला परकीय चलन मिळवून देत असतील असे वाटत नाही. पण परदेशात जाणारे साधारण ७५-९०%(अंदाजे) तरी देशाला परकीय चलन मिळवून देतात असे वाटते.

देशावरील नैसर्गिक संकट-
गुजरात भूकंप असो, मुंबईचा पाऊस असो किंवा त्सुनामि असो. आर्थिक मदतीचा आलेख रुपयांतून मांडला तर चलनविनीमयामुळे परदेशस्थ भारतीयांची मदत सिंहाचा वाटा घेऊन जाईल असे वाटते.

हे झाले अर्थव्यवस्थेवर प्रत्यक्ष परिणाम घडवणारे घटक. आता अप्रत्यक्ष घटक पाहूयात-

समजा १०० कोटी लोकसंख्येतून १ लाख (०.०१%) टक्के लोक दर वर्षी परदेशात कायमच्या वास्तव्यासाठी जातात असे समजू. भारतातील स्पर्धेतून १ लाख लोक त्याक्षणी कमी होतात.

तसेच भारतीय मुलगा असो वा मुलगी सामान्यतः ते लग्न करतील असे समजू. पण त्यातल्या निम्म्या लोकांनी परदेशी नागरिकांशी (जे वंशाने भारतीय, अमेरिकी, युरोपियन आहेत) लग्न केले किंवा केलेच नाही असे समजू. आणि उरलेल्या निम्म्या लोकांनी भारतीयाशी लग्न केले असे समजू. आणि संसार चालायचा म्हणजे दोघांनी एकत्र राहणे आलेच. म्हणजे आणखी ५०हजार लोक भारतातून बाहेर गेले. म्हणजे एक भारतीय जेंव्हा परदेशी स्थलांतर करतो तेंव्हा त्याच्याबरोबर साधारण दीड ते दोन लोक स्थलांतर करतातच असे म्हणणे गैर ठरू नये.

परदेशात गेलेल्या पहिल्या पिढीला एका माणसाच्या पगारावर आर्थिक सुबत्ता मिळवायला वेळ लागतो म्हणून त्याचा/तिचा जोडीदार या-ना-त्या प्रकारे तिथे कमाई चालू करतो. त्यातला काही अंश अर्थातच भारतात पाठवला जातो.

तसेच या पहिल्या पिढीतल्या जोडप्याची मुले नवीन देशात जन्माला येतात. त्याचा भारतीय स्पर्धेशी काहीही संबंध नाही. किमान एक आणि कमाल तीन मुले असे समजले तर एक माणूस परदेशात गेला त्याच्यामागे अडीच ते पाच लोक परदेशात गेल्यासारखे आहे. ज्याचा ताण भारतीय लोकव्यवस्था, समाजव्यवस्था, राज्यव्यवस्था, शिक्षणव्यवस्था आणि अर्थव्यवस्था यांच्यावर पडत नाही.

परदेशस्थ नागरिकांमुळे मूळ देशाची प्रतिमा स्पष्ट व्हायला मदत होते असे वाटते. (अनेक अमेरिकी नागरिकांचे भारताबद्दलचे अनेक गैरसमज दूर करण्याचे प्रामाणिक प्रयत्न मी अनेकवेळा केले आहेत.) परदेशस्थ नागरिक हा त्या मूळ देशाचा परदेशातला एक प्रतिनिधी आणि दूत असतो असे वाटते. काही गोष्टी राजदूत सामान्य लोकांत मिसळून करू शकत नाही ते सामान्य लोक सामान्य लोकांत मिसळून करू शकतात.

पहिल्या पिढीतल्या लोकांना शक्य झाले नाही तरी त्यांची दुसरी, तिसरी पिढी राजकीयदृष्ट्या सक्रिय होऊ लागते आणि त्यांनी कितीही नाकारले तरी भारताबद्दल त्यांच्या मनात खोलवर कुठेतरी प्रेम असते असे वाटते. आज जे लोक अमेरिका चालवत आहेत त्यातले फार थोडे तिथले मूळ लोक आहेत. बाकी सगळे स्थलांतरित लोक आहेत. ५-१०-१५ पिढ्यांनंतर एखादी भारतीय वंशाची व्यक्ती या सरकारात उच्चपदस्थ सहज होऊ शकते. जे आंतरराष्ट्रीय राजकारणांत भारताचे पारडे जड ठरवू शकेल. (अमेरिका उदाहरणार्थ आहे. इतर देशांतही हे सहज शक्य आहे असे वाटते.)

तसेच माझे सामान्य निरीक्षण असे आहे की परदेशात आलेल्या लोकांचे आपल्या देशाबद्दल काहीतरी करण्याची इच्छा जास्ती प्रबळ असते. आणि कृतिशीलतेत त्यांचा वाटा देशस्थ भारतीयांपेक्षा मोठा नसला तरी किमानपक्षी बरोबरीचा असावा असे वाटते. (याच्या समर्थनार्थ किंवा खंडनार्थ कोणी काही अधिकृत आकडेवारी दिल्यास त्याचे खुल्या दिलाने स्वागतच आहे.)

इतक्या सर्व सकारात्मक गोष्टी असताना परदेशात राहणे गैर कसे हे सांगावे.

तसेच भारतात राहून, भारताची लोकसंख्या वाढवून, देशातला पैसा देशातच खेळवून, भारतीय व्यवस्थेवर ताण वाढवून राहणे योग्य कसे तेही सांगावे.