ह्यावरून असे दिसते, सर्व अनिवासी भारतीयांपासून फायदा होत नाही

सर्व निवासी भारतीयांपासून होत असावा असेही वाटत नाही.

जे अमेरिकेतच जन्मले, त्यांच्या कडून जास्त अपेक्षा ठेवणे अवघडच!!

त्यांच्याकडून अपेक्षा ठेवाव्यात का? हाच मूळ प्रश्न आहे. ते अमेरिकि नागरिक आहेत. तुम्ही अमेरिकेवर प्रेम करता का? मग अमेरिकेत जन्मलेल्या व्यक्तीने तुमच्या देशावर प्रेम करावे असा अट्टहास का?

अमेरिकेचे इस्त्राईल प्रेम -
इस्त्राईलचा आज जगात कितवा नंबर आहे ते मला माहीत नाही.. पण नक्कीच खूप वरच नसावा..

या यादीप्रमाणे इस्त्राईलचा नंबर इराण, इजिप्त च्या खाली आहे, तर इराक, सिरीया, लेबनान यांच्या वर आहे असे दिसते. तसेच जगात कितवा नंबर आहे हा माझा मुद्दा नव्हता. मुद्दा हा की ज्यूंनी चतुरतेने अमेरिकेत अश्या जागा संपादन केल्या आहेत की ते एका महासत्तेला त्यांच्या बाजूने वळवून घेण्यात यशस्वी झाले आहेत. आणि ही त्यांची पहिली पिढी नव्हे.

भारतात कमाई करणारे सगळेचजण देशाला परकीय चलन मिळवून देत असतील असे वाटत नाही.

बरोबर. पण, फक्त परकीय चलनानेच देशाची प्रगती कशी होणार?

उदा० पोलीस - समाज व्यवस्था ठेवतो (वादाचा मुद्दा..?) शिक्षक - समाज घडवतो, सैनिक - संरक्षण करतो. इत्यादी..

सगळेच घटक महत्त्वाचे आहेत. कोणी परदेशात जाईल, कोणी सैनिक बनेल, कोणी पोलीस बनेल, कोणी शिक्षक.

परदेशात जाणारे देशात राहून याच व्यवसायांत पडलेच असते कशावरून.

दरवर्षी देशातले फक्त ०.०१% टक्के लोक या देशातून परदेशात गेले तर वरील व्यवसाय करायला कोणी मिळणारच नाही हा युक्तिवाद दिशाभूल करणारा आहे.

भारत सरकार मुलांच्या शिक्षणावर, समजावर व इतर गोष्टींवर नक्कीच खर्च करते.. म्हणजे.. लहानपणाकरता, शिक्षणाकरता भारतात राहायचे आणी जेव्हा शिकून पुणे झाले की दुसऱ्या देशाला फायदा करून द्यायचे? हा भारतीय व्यवस्थेवर ताण नाही का?

असहमत.
माझ्या शिक्षणावर भारत सरकारने फार काही खर्च केला असावा असे दिसत नाही. केला असेलच तर मी ते ऋण माझ्या नोकरीच्या काळात प्राप्तिकराच्या रूपाने सव्याज आणि घसघशीत स्वरूपात फेडले आहे असे वाटते.

प्रत्येक भारतीय, जो आपल्या देशात धर्माने (आपापल्या) नोकरी - धंदा करतो.. तो देशसेवाच करतो म्हणाले तर काय वावगे आहे?

असहमत.
एखादा अभियंता भारतात राहिला तर ती देशसेवा आणि देशाबाहेर राहिला तर देशसेवा नाही हे कसे? तसेच चोराचा धर्म चोरी असतो. तो चोरही देशात राहत असेल तर चोरी देशसेवा कशी ठरते?

पोलीस, जो इमाने आपले काम करतो

या वाक्यातच विरोधाभास दडलेला आहे. :))

शिपाई, जो प्राणपणाने रक्षण करतो.. हे लोक सातत्याने मातृभूमीची सेवा करत असतात..

सहमत.
पण दर वर्षी दोन कोटी नवीन लोक सैन्यात भरती होण्यास लायक बनतात. तरीही भारतीय सैन्यात माणसांची कमतरता का भासते? भारतातले सर्वजण शिपाई नाहीत असे वाटते.

"काही गोष्टी राजदूत सामान्य लोकांत मिसळून करू शकत नाही ते सामान्य लोक सामान्य लोकांत मिसळून करू शकतात." -
काही प्रमाणांत सहमत. काही ठिकाणी असे पाहिले जाते की, भारतीय लोक सर्वात जास्त उद्धट आहेत. (हा निष्कर्ष एका भारतीय मंदिरातील अभ्यासाचे निरीक्षण आहे!)

उद्धट असले तरी त्यांचा संपर्क परदेशातल्या सामान्य माणसांशी येतो आणि ते एखादा राजदूत खचितच करू शकतो. (तसेच परदेशातल्या भारतीय मंदिरांत भारतीय कसे वागतात याचा भारतीयांनी परदेशात-राहावे की नाही या चर्चेशी असलेला संबंध समजला नाही.)

एखादी भारतीय वंशाची व्यक्ती या सरकारात उच्चपदस्थ सहज होऊ शकते. जे आंतरराष्ट्रीय राजकारणांत भारताचे पारडे जड ठरवू शकेल. -
आशावादी राहण्यांस हरकत नाही, पण ह्याचे प्रमाण किती असणार व असे होईलच ह्याची खात्री नाही.

भारतात राहून हे संपूर्णतः अशक्य आहे असे वाटत नाही का? भारतातच राहिले तर परदेशातल्या मंत्रिमंडळात भारतीय वंशाचे रक्त असण्याची शक्यता शून्य आहे असे वाटते.

- भारतात राहून, देशसेवा सुद्धा करता येईल.

भारतात राहणाऱ्या भारतीयांकडून देशसेवा कशी घडते आहे ते सांगावे.

एक अपत्य असल्यास लोकसंख्या वाढवण्याचा प्रश्न नाही.

असा विचार किती भारतीय अपत्ये करतात?

तुम्ही जर आपल्या कामाशी प्रामाणिक असाल तर भारतीय व्यवस्थेला मदतच आहे!

१००कोटी जनतेपैकी किती लोक आपल्या कामाशी प्रामाणिकपण आहेत असे वाटते?

ह्याचा अर्थ मी संपूर्ण विरोधात आहे असे नाही.

वाचून बरे वाटले.

देशप्रेमी अनिवासी भारतीय असले तरी, त्यांची पुढची पिढी देशप्रेमी असेल ह्याची शक्यता मला फार कमी वाटते..

हे विधान देशप्रेमी दुसऱ्या पिढीवर अन्यायकारक आहे. तुम्हाला पुढची पिढी भारतप्रेमी असेल का याची शक्यता कमी वाटत असावी. पण तशी अपेक्षा ठेवणे गैर आहे असेही वाटते. ते त्यांच्या जन्मभूमीवर प्रेम करोत अथवा न करोत आपल्याला त्याच्याशी काही घेणे-देणे नसावे असे वाटते.

तसेच आता या क्षणी भारतातली एकूण सर्व व्यक्ती देशप्रेमी आहे असे आपण छातीठोकपणे सांगू शकता काय? म्हणजे देशात राहणारे ९९% कसेही असले तरी चालतील. देशाबाहेर जाणारे १% मात्र १००% मूळ-देशप्रेमी हवेत असा आपला हट्ट आहे का?

कोणत्याही संतांनी परदेशाचे महत्त्व का सांगितले नाही? ही सुद्धा विचार करण्याची गोष्ट आहे.

जुने संत ज्या काळात झाले त्या काळात परदेशगमनावर सामाजिक बंदी होती असे म्हणाले तरी चालेल. त्यातूनही ज्यांनी कोणी भ्रमण केले ते भारतीय उपखंडातच फिरले. स्वामी विवेकानंद हेच काय आठवतात जे खरेच भारत सोडून परदेशात गेले. आधुनिक काळातले संत तुमच्या-आमच्या प्रमाणेच विमानाने जगभ्रमण करत असतात असे दिसते.

संतांनी इतर अनेक गोष्टी सांगितल्या आहेत ज्या आचरणात आणण्यासाठी भारतात राहणे आवश्यक आहे असे कोणीही कुठेही लिहिलेले नाही. स्वामी विवेकानंदांनी भारताचे योग्य तिथे कौतुक आणि अयोग्य तिथे कोरडे ओढले आहेत. पण भारतातच राहा असे लिहिल्याचे मला आठवत नाही. (असल्यास जरूर सांगावे. कोणत्या खंडात आहे तेही सांगावे.)

===

तुमच्या लेखनात शुद्धलेखनाच्या खूप चुका आढळतात. देशप्रेमाबद्दलची चर्चा मातृभाषेतून करताना शुद्धलेखनाची अपेक्षा ठेवणे फार गैर आहे असे वाटत नाही. प्रशासकांनी महत्प्रयासाने शुद्धिचिकित्सक उपलब्ध करून दिला आहे त्याचा वेळोवेळी उपयोग करा असे सुचवावेसे वाटते.