माझीही काही मते

>>परदेशातल्या मंत्रिमंडळात भारतीय वंशाचे रक्त असण्याचा अट्टहास का? त्याचा उपयोग होण्याची खात्री काय?

अगदी त्रयस्थापेक्षा भारतीय वंशाचा माणूस भारताबद्दल आपुलकी बाळगण्याची शक्यता जास्त आहे.  मला वाटते हे उघड आहे.

भारतीय वंशाच्या लोकांना भारताविषयी प्रेम बहुधा असते असा माझा अनुभव आहे. अमेरिकेत वाढलेली भारतीय वंशाची मुले आपली मुळे तोडून टाकतातच असे नाही. आईवडिल काय संस्कार करतात ह्यावर हे अवलंबून आहे. मी पाहिलेली अनेक उदाहरणे आहेत की मुलांना भारताविषयी, तिथल्या चालीरीती, सण, अन्न, भाषा ह्याविषयी आकर्षण असते. हल्ली इतके भारतीय अमेरिकेत आहेत की मुलांचे सगळे मित्र मैत्रिणी भारतीय असणे शक्य आहे. आमच्याकडेही हेच आहे. ही थोडी घेटो (कळपाने वेगळे रहाणे) मनोवृत्ती असली तरी त्याचा भारताला फायदाच होतो.

>>तात्पर्यः दुसर्या देशाचे प्रेम मिळवण्यास तुम्ही तेथेच जाणे जरुरी नाही!
अमेरिकेत राजकीय लॉबी (दबावगट) असणे अत्यंत फायद्याचे असते. सध्याचे अमेरिकेचे प्रेम हे आर्थिक कारणांकरता आहे. ते फार वेळ टिकेल असे नाही. उद्या अन्य कुठल्या देशात कामे स्वस्तात करुन घेता आली तर भारतावर खप्पामर्जी होईल. उलट भक्कम लॉबी असेल आणि त्यांच्याकडे भरपूर पैसे असतील तर राजकीय पुढारी त्या लॉबीच्या कलाने वागेलच. पैशाची, मतांची भाषा राजकीय नेते चांगली समजतात.
 आपण भारतीयस्थ लोकांशी परदेशस्थ भारतीयांशी केलेली तुलना विषयांतर म्हणून दुर्लक्ष करता पण मला ते पटत नाही. सारखीच कुवत (आर्थिक, बौद्धिक) असणारे दोन जण असतील एक भारतस्थ व एक अमेरिकस्थ तर फायदा तोटा मोजायला दोघांची तुलना करणे अपरिहार्य आहे.