नवीन सोन्याचा शोध अजून लागला नाही
मराठी चित्रपट संगीताची पातळी गेल्या दोन तीन दशकात फार खाली घसरली हे मान्य. आता येणाऱ्याही बऱ्याच चित्रपटांचे संगीत अत्यंत वाईट आहे हे ही मान्य. पण जे काही हाताच्या बोटावर मोजण्याइतके चांगले प्रयत्न आहेत त्यांना दाद ही द्यायलाच हवी. नाहीतर हिंदी गाण्यांच्या लाटेत हेही टिकून राहणार नाही.
शिवाय नवीन गाण्यांनी लोकसंगीताची आणि शास्त्रिय संगीताची दोन्हींची साथ सोडली आहे.
लोकसंगीताबाबत बोलायचे तर पूर्वीच्या काळातले संगीतकारांचे (जे लोकसंगीतासाठी प्रसिद्ध होते) हे मराठी मातीशी, इथल्या ग्रामीण संस्कृतीशी घट्ट नाते जडलेले होते. ते खेड्यापाड्यातून वर आलेले असल्याने (कोल्हापूर हे आता एक शहर असले तरी त्याकाळात ते एक मोठे खेडे यास्वरुपाचे गाव होते जेथे बऱ्याच गाजलेल्या चित्रपटांची निर्मिती झाली.) त्यामुळे त्यावेळेच्या संगीताला अस्सल लोकसंगीताचा बाज मिळाला.
आजचे संगीतकार हे शहरी संस्कृतीतले आहेत. त्यामुळे त्यांची गाणी ही वेगळ्या धाटणीची आहेत. शिवाय आज खेड्यापाड्यात ही 'झलक दिखला जा' ही आणि अशी गाणी वाजताहेत. चॅनल संस्कृतीमुळे हिंदी गाणी तिथेही पोहचली आहेत. त्यामुळे लोकसंगीत, ते देणारे संगीतकार आणि ते ऐकणारे रसिक हा एक वेगळ्या चर्चेचा विषय होऊ शकेल. आपल्यापैकी किती जणांना विठ्ठल उमप यांचे नाव माहीत आहे? आणि किती जणांनी 'जांभूळ आख्यान' पाहिलेले आहे? हे आणखी अंतर्मुख करणारा प्रश्न.
पूर्वी जेवढ्या प्रमाणात रागदारीवर आधारित गाणी रचली जात असत तेवढी आता नाहीत हेही खरे. पण आताचे संगीत हे वेगळे आहे आणि त्याची सरळ जुन्या संगीताशी तुलना नाही करता येणार. पण त्यातले चांगले ओळखायला हवे.
त्यामुळे नव्या सोन्याचा शोध लागायची वाट पाहण्यापेक्षा नव्यामध्ये असलेले सोने ओळखणे आणि ते जपणे हे जास्त गरजेचे आहे असे मला वाटते.
-ओंकार.