१. स्वदेशस्थ भारतीय परदेशस्थ भारतीयांबद्दल किती आपुलकी दाखवतात?

आम्हाला आपुलकी वाटते. आपली गाठ पडेल तेव्हा दाखवूच.

२. NRIना नॉट रिक्वायर्ड इंडीयन्स म्हणले जाते. अश्या प्रकारे हिणवल्या जाणाऱ्या लोकांकडून स्वदेशस्थ भारतीयांनी अपेक्षा ठेवणे योग्य कसे?

आम्ही हिणवत नाही. अपेक्षाही ठेवत नाही.
पण तुमच्याकडून आम्ही काहीच अपेक्षा न ठेवलेली तुम्हाला आवडेल काय?

३. परदेशस्थ स्वतःहून परदेशी जातात. तेंव्हा तुम्ही कुठे राहावे हे सांगायला येतात का? मग देशस्थ भारतीयांनी परदेशस्थ लोकांना कुठे राहा, काय करा हे सांगण्याचा काय अधिकार आहे?

माझ्यापुरते बोलायचे तर मी प्रत्येक परदेशी कायम वास्तव्यास जाणाऱ्या माणसास त्याच्या उद्देशांची खात्री करवून घेण्यास, इथे राहण्यास प्रवृत्त करण्यास, उद्युक्त करण्याचा प्रयत्न करतो. पण माझा अनुभव असा आहे की परदेशात (विशेषतः अमेरिकेत) जाण्याचे ठरविलेला इसम कुणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो. बहुधा तो स्वतःही पूर्ण विचार करूनच जातो असेही खात्रीपूर्वक सांगता येणार नाही. परिस्थितीच्या अपरिवर्तनीय रेट्याखाली तो अमेरिकेत ओढल्या जातो. नंतर तिथल्या व इथल्या राहणीमानातला मोठा फरक त्याला कधीच परतू देत नाही.

४. स्वदेशस्थ भारतीय भारतात राहून अशी काय महान देशसेवा करतात की ज्यांनी परदेशस्थ भारतीयांना अमके करा- तमके करा असा उपदेश करावा? सामान्य माणसांच्या महान देशसेवेची उदाहरणे द्यावीत. बाबा आमटे किंवा तत्सम व्यक्तिंची नावे अपेक्षित नाहीत. ती माणसे वादातीत असामान्य आहेत असे वाटते.

इथल्यांनी आपल्या देशाची सेवा केल्याचे तपशील तुम्हाला का म्हणून सादर करावेत? अर्थातच तुम्हाला उपदेशही करू नयेत. आम्ही करत नाही. पण त्यामुळे तुम्हाला देशसेवा कराविशी वाटू नये असे काहीही नाही.

५. तसेही देशसेवा किती आणि कशी हा म्हणावे तर ऐच्छिक मुद्दा आहे असे वाटते.

इथे देशसेवा करणे हा आपल्या जन्मजात कर्तव्याचा भाग मानल्या जातो. तशी सेवा केल्याचा ढिंढोरा पिटणे आम्हाला अपमानास्पद वाटते. देशसेवा करणे हा ऐच्छिक मुद्दा वाटण्यापर्यंत तुमचा प्रवास झालेला आहे हे वाचून वाईट वाटले.

तिथली मुले आपल्या प्रस्थापित होण्यासाठी आईबापांचा आधार घेणे हीन समजातात. असा माझातरी समज आहे. भारतातून आईबापांच्या सशक्त आधाराने घेतलेल्या शिक्षणाच्या आधारे अमेरिकेतील स्वावलंबी मुलांशी स्पर्धा करणाऱ्यांनी मायबापांचेही ऋण मानू नये म्हणजे दोन्हीकडून जबाबदाऱ्या टाळण्यासारखा बेजबाबदारपणा होतो आहे असे तुम्हाला वाटत नाही काय?