जी.एं. च्या कथांमधील निराशावाद / नियतीवाद आणि त्यांची पु. लं. बरोबर केलेली तुलना, सुख आणि दुःख यातील तुलना, जी.एं. चे एकटेपण आणि त्यामुळे त्यांच्याविषयी ते 'गरीब' असल्याचा उल्लेख असे काही वाचले.
मुळात लेखकांचे 'हसवणारा' आणि 'रडवणारा' असे काही वर्गीकरण करता येत नाही. त्यातून जी.ए. काही रडवणारे लेखक नव्हते. मानवी भावनांपैकी दुःख ही एक भावना आहे आणि जी.एं. नी आपल्या लिखाणातून ती प्रामुख्याने मांडली इतकेच.  येथे दुःख कुरवाळण्याचा प्रश्नच नाही. आणि जी.एं. नी आपल्या लिखाणातून अनेकांना सुन्न, अस्वस्थ केले हे त्यांचे योगदान आपल्या लिखाणातून लोकांना मनमुराद हसवणाऱ्या पु. लं. पेक्षा तिळमात्रही कमी नाही. ( पु. लं. च्या काही अत्यंत आवडत्या लेखकांपैकी जी.ए.एक होते हे मुद्दाम लिहावेसे वाटते). पु. ल. आपल्या जागी श्रेष्ठ, जी.ए. आपल्या जागी.
जी.एं. नी अवचटांच्या लग्नाला न जाण्याबाबत म्हणाल तर कलाकार हा त्याच्या कलेतून बघावा. कोणत्याही कलाकाराची व्यक्तीपूजा करायला गेलात तर भ्रमनिरासच होण्याचे शक्यता अधिक. जी.ए. अवचटांच्या लग्नाला गेले नाहीत तर त्यांना लगेच अतरल, गरीब म्हणण्याचे कारण नाही. नाही गेले तर न जाऊ देत बापडे! त्यामुळे त्यांच्या 'माणसे- अरभाट आणि चिल्लर' मधील मजा कमी होते का?
जी.एं. विषयीच्या लिखाणाला इतका (ही) प्रतिसाद मिळेल असे वाटले नव्हते. आपल्या सर्वांचे आभार.
सन्जोप राव