पण जीएंसारखे विलक्षण लेखक लाभले असताना मराठी कथा (कादंबरी सोडून द्या) फारशी जागतिक पातळीवर का पोचली नाही? 
माझ्या मते याची बरीच कारणे आहेत. एकतर आपल्या इतर सर्व उत्पादनांसारखेच आपल्या साहित्याचे विपणन ( मार्केटिंग ) नीटसे होऊ शकले नाही. जी.एं नी स्वतः काही अमेरिकन कादंबऱ्यांचे अत्यंत प्रभावी असे मराठी अनुवाद केले आहेत. मग जी.एं. चे स्वतःचे मराठी लिखाण इतके विपुल असून त्याचे इतर भाषांमध्ये सरसकट अनुवाद का झाले नाहीत? इतकी विलक्षण गुणवत्ता असूनही जी.एं. सारखा लेखक हा 'बेस्टसेलर' म्हणून उदयाला न येता काही बुद्धीजीवी लोकांनी वाचण्याचा लेखक म्हणूनच का राहिला?  जी. एं. च्या 'प्रवासी', 'इस्किलार','स्वामी','ठिपका' या कथा कोणत्याही आंतरराष्ट्रीय लेखकाच्या तुलनेत यत्किंचितही कमी आहेत असे वाटत नाही. ओ. हेन्री या लेखकाच्या गोष्टींच्या चकरावून टाकणाऱ्या शेवटाचे फार कौतुक केले जाते. जी.एं. ची 'विदूषक' घ्या, फार कशाला 'चैत्र' घ्या...या कथा ओ. हेन्रीच्या कथांपेक्षा कुठेही कमी आहेत असे वाटत नाही. मग जर सिड्ने शेल्डन, रॉबीन कुक , हेरॉल्ड रॉबिन्स आणि जे.के. रॉलिंगचे मराठीत अनुवाद होतात (आणि हातोहात खपतात), तर तसे जी.एं च्या बाबतीत का झाले नाही? याचे एक महत्वाचे कारण ( मी इतरत्र लिहिल्याप्रमाणे) असे की जी.ए. हे नेहमीच विचारप्रधान लेखक राहिले, करमणूकप्रधान नव्हे. ( याचे 'ब्राम्हणी' आणि 'अब्राम्हणी' असे वर्गीकरण करता येते का किंवा ते तसे करावे का, हे मला माहिती नाही.) लिखाणाचे करमणूक हे एकमेव उद्दिष्ट असू नये. वैचारिक, गंभीर लिखाणाला जोवर लोकमान्यता प्राप्त होण्याइतपत समाजाची बौद्धीक पातळी उंचावत नाही, तोवर मराठी लेखक पात्रता असूनही आंतरराष्ट्रीय पातळीवर जाणे कठीण आहे. 
एकंदरित मराठी कथेत थेटपणा, साधेपणा, युनिवर्सल अपील नाही असे माझे मत आहे.
असहमत.
'सत्यकथे' बरोबरच मराठी कथेचे सुवर्णयुग संपले असे मला वाटत नाही. व्यंकटेश माडगूळकर, अरविंद गोखले, विद्याधर पुंडलीक, गंगाधर गाडगीळ यांच्या पिढीइतकीच प्रतिभा असलेली मराठी कथालेखकांची पिढी अस्सल, दर्जेदार कथा लिहीते आहे. भारत सासणे, राजन गवस, मिलिंद बोकील, आशा बगे, पुरुषोत्तम बोरकर.. या पिढीचे लिखाणही तितकेच प्रभावी आणि सरस आहे. त्यामुळे
परिस्थिती झपाट्याने बदलते आहे
हेच खरे.
सन्जोप राव