मी लेख धावता वाचला. अनेक लोकांची मते घेतली आहेत. 'मराठी माणूस फटकून वागणारा' आणि 'मराठी अगत्य हात राखून' हे दोन मुद्दे जास्त तोंडी दिसले.

कोण्या एका समाजाच्या स्वभावाबद्दल निश्चित अनुमान काही मतांवरुन कसे करता येईल? मनोगतावरील मराठी बंधूनो, तुमच्यापैकी काही महाराष्ट्र सोडून दुसर्‍या राज्यांत राहत आहात.(मला माहीती असलेले २ म्हणजे विजय चिकटे आणि मीराताई.) सगळीकडे काही चांगली आणि काही वाईट माणसे असतात. दुसर्‍या राज्यात राहणार्‍या मराठी माणसालाही अनेक चांगले वाईट अनुभव आले असतील. अ-मराठी माणसाशी फटकून(मला इथे 'जपून' हा शब्द जास्त बरोबर वाटतो.) वागणार्‍या मराठी माणसाने आधी अ-मराठी माणसाचे, त्याच्या आक्रमकतेचे काही कटू अनुभवही घेतले असतील. आणि स्वत:च्या राज्यात सोयी सुविधा नाहीत म्हणून महाराष्ट्रात राहून मराठी माणसाच्या दोषांचीच जाहीरात करणे हेही त्यांच्या आक्रमकपणाचेच उदाहरण नाही का?अ-मराठी राज्यात राहत असलेला मराठी माणूस त्या राज्यातील लोकांविषयी संभाळून आपली जाहीर मते व्यक्त करेल, कारण एक: भिती आणि कारण दोन: यांच्या राज्यात राहून यांना कशाला दुखवायचे हा भिडस्तपणा.   

'मराठी माणूस बाहेर जायला तयार नसतो' हे चित्र आज बदलत आहे असे मला वाटते. आणि काय हो, बिहार-ओरीसा-कलकत्ता-पंजाब या त्यांच्या राज्यांत त्याना हवा तो उद्योगधंदा मिळत नाही, किंबहुना मुंबई/पुणे/महाराष्ट्र त्यांना त्यांच्या राज्यापेक्षा जगायला सुरक्षित वाटते म्हणून 'जे होईल ते होवो, आपल्याला महाराष्ट्रात येऊन स्थिरस्थावर व्हायचे आहे.' या निर्धारानेच ते इथे येतात ना? महाराष्ट्रीयांत हा निर्धार कमी आहे कारण महाराष्ट्रात त्याना हवे ते मिळू शकते अशी खात्री असल्यावर ते का दिब्रूगडला जातील? 'विद्युतप्रवाह'(electric current) आणि 'रोध'(resistance) याबाबतीत नियम आहे कि २ वेगवेगळ्या रोधांचे मार्ग समांतर असले तर विद्युतप्रवाह नेहमी कमी रोध असलेला मार्ग निवडतो. 'महाराष्ट्रात राहणे' हा सुलभ मार्ग आहे.

आणि अर्थातच संधी बोलावू लागल्या तेव्हा बंगलोर, चेन्नई, हैदराबाद, नॉयडा, अहमदाबाद, गुरगांव या ठिकाणी मराठी माणूस गेलाच ना?विचारा अशा परराज्यातील मराठी माणसांना, त्यांचे अनुभव एका अ-मराठी माणसाला महाराष्ट्रात राहून आलेल्या अनुभवांपेक्षा कटू असतील. मराठी माणूस फक्त आपल्या राज्यात राहणार्‍या अ-मराठी माणसाशी फक्त फटकून वागतो, पण मुद्दामून आणि कारण नसताना त्याचे वाईट करायला जात नाही. 'live and let others live' आणि 'mind your own business' ही मराठी माणसाची जीवनसरणी.

अर्थातच मराठी माणसाने आता आपला सरळपणा आणि 'कोणीही यावे टिकली मारुन जावे' हा मवाळपणा सोडून आपल्या अ-मराठी बांधवाप्रमाणे आक्रमक आणि धूर्त बनले पाहीजे, तरच त्याचा या स्पर्धेत टिकाव लागेल.
(लेख अजून पूर्ण वाचला नाही, पूर्ण वाचल्यावर अजून काही मुद्दे निघतील असे वाटते.)
आपली (मराठमोळी)अनु