प्रसाद, अगदी काळजाला हात घालणारी कथा आहे. ही कथा मी आधी वाचली नव्हती. तुम्ही ही कथा इथे लिहून मला वाचण्याचे भाग्य लाभू दिल्याबद्दल अनंत आभारी आहे.

कुडीतून प्राण निघून गेल्यावरही स्वतःच्या बाळांवर सक्रिय प्रेम करणारी आई.. खरंच काय अप्रतिमपणे रंगवली आहे या कथेत. अशा आईपणाला सप्रेमे अगणित सादर प्रणाम ! स्वतःच्या पोटात भुकेने आगडोंब उसळलेला असताना रुढींना न जुमानत धैर्य करून आणलेला पिंडातला भात स्वतः न खाता लहानग्याला देणारा मोठा भाऊ.. अशा जीवलग नातेवाईकांना तर स्वतःच्या कातडीचे जोडे करून घालायला दिले तरी त्यांचे ऋण फिटणार नाही असे वाटते. जबाबदारीला कंटाळून ती झटकून पळून जाणारे वडील आणि चिमुरड्या भाच्याचा जीव बेशुद्ध व्हायला आला तरी ज्याच्या पोटात माया उत्पन्न झाली नाही असा मामा यांच्याबद्दल काही बोलायला तर माझ्या मनातला तीव्र राग जीभच रेटू देत नाही आहे.

कठीण समय येता, कोण कामास येतो.. खरंच यावरच जोखायचं असतं कोण खरंच आपलं आणि कोण नाही ते. माझ्या छोट्याशा आयुष्यात असे बरेच पोळवणारे प्रसंग अनुभवायला मिळालेत.. आज ही कथा वाचून उगाच खपली निघाल्यासारखं वाटलं ! जखमा भरल्या आहेत आता.. दरवेळेस कुठल्याही कारणाने मागे उरलेल्या त्या जखमांच्या व्रणांकडे बघते तेव्हा कोणाकडूनही कुठल्याच परिस्थितीत कुठल्याच स्वरूपाच्या अपेक्षा न ठेवता मार्गक्रमण करायला जबरदस्त हुरूप येतो आणि खऱ्या जिव्हाळ्याच्या माणसांबद्दल नितांत आदर आणि प्रेमच पाझरते !

प्रेमापुढे इतर सगळ्या रुढीपरंपरा झूठ हेच खरं !