मनोगतींनो,
या लेखाच्या प्रतिसादांतून मला बरीच महत्वाची माहीती मिळाली. त्याबद्दल मन:पूर्वक आभार. तरीही हे सांगावेसे वाटते कि हा लेख लिहीण्यामागचा माझा मूळ उद्देश 'हिंदीचा पुरस्कार' किंवा 'दाक्षिणात्यांनी हिंदी शिकावी' हा नसून 'आंग्ल भाषेचे पाय कामाव्यतिरिक्त शक्यतो धरु नका, जिथे शक्य असेल तिथे आणि तेव्हा भारतीय भाषेला प्राधान्य द्या' हा आहे. 'हिंदी ही' हा माझा आग्रह नाही. 'हिंदी भी' का नको? हा साधा प्रश्न आहे.
मी आतापर्यंत वाचलेल्या ईतिहासात तरी 'हिंदी भारताची राष्ट्रभाषा' हे शिकले. जेव्हा २ मराठी, २ तामिळ, २ बंगाली एकत्र येता तेव्हा एकमेकांशी बोलताना साहेबाची भाषा न वापरता दुसरी कोणतीतरी भाषा वापरा, आणि ही कोणतीतरी भाषा 'हिंदी', कारण ती चित्रपट आणि रेल्वे स्थानकावरील पाट्या आणि साबण नाट्य(मला 'सोप ऑपेरा'म्हणायचे आहे!!) यामधून सामाईक आहे. मराठी माणसाने तामिळ बोलणे, बंगाली माणसाने मराठी बोलणे, तामिळ माणसाने गुजराती बोलणे यापेक्षा 'सर्वांनी हिंदी बोलणे' हि शक्यता मला जवळची वाटली. हिंदी भाषिक माणसांशी मला या सर्वांपेक्षा जास्त जिव्हाळा आहे असे अजिबात नाही.
पुन्हा एकदा सांगते, अनेक प्रतिसादांतून जो 'आपली भाषा सोडून हिंदीचे पाय धरा' अर्थ माझ्या लेखाला दिला गेला आहे तो मला अभिप्रेत नाही. चीन,जपान,जर्मनी, इटली,स्वीडन सर्व आपापल्या भाषा धरुन आहेत आणि कामासाठी आणि आवश्यक तितकीच आंग्ल भाषा वापरतात आणि बाकी ठिकाणी त्यांची स्वत:ची भाषा. भारताला जो अनेक भाषांचा प्रश्न आहे तो या देशाना नाही. एक मुख्य भाषा ही प्रत्येक देशात जास्त प्रमाणात आहे त्यामुळे तिला बोलीभाषा बनवणे त्यांच्यासाठी सोपे आहे. भारताला अनेक प्रांतिय भाषा असल्याने 'कोणती भाषा समाईक' हे ठरवणे कठीण आहे पण हिंदी निदान कागदोपत्री तरी समाईक भाषा म्हटली जाते.
आपण भारतीयांनी आंग्ल भाषा कामापुरती वापरुन इतरत्र शक्यतो मातृभाषा आणि बहुभाषिय मेळाव्यात साहेबाची भाषा न वापरता भारतीय समाईक भाषा वापरावी, हे माझे मत व्यक्त करण्यासाठी आणि मनोगतींची मते जाणून घेण्यासाठी हा लेखप्रपंच..
अमुक भाषाच फक्त शिका, असे म्हणणे अजिबात नाही. जितक्या जास्तीत जास्त भाषा शिकता येतील तितक्या शिका, पण बहुभाषिय मेळाव्यात भारतीय भाषांचा वापर करा(अरे बापरे, हे वाक्य मी जास्त वेळा लिहीलं वाटतं!!) हे मत व्यक्त करण्यासाठी हा लेख लिहीला आहे. दाक्षिणात्यांशी माझे कोणतेही विशेष वैर नाही आणि हिंदीभाषिकांशी कोणतीही विशेष जवळीकही नाही.
आपल्या सर्वांच्या प्रतिसादांबद्दल आभार. चर्चेतून बरीच उपयुक्त माहीती मिळत जाते.मनोगतावरील प्रत्येक सामाजिक बहुचर्चित लेख आणि त्याचा प्रत्येक प्रतिसाद मी आवर्जून वाचते(स्वत: प्रतिसाद लिहीण्याइतका व्यासंग नसला तरी) कारण प्रत्येक प्रतिसाद एका नविन पैलूवर प्रकाश टाकत जातो. मनोगतावर ज्ञानी मंडळी अनेक विषयांवर लिहीत रहावीत, हि सदिच्छा!
आपली(राष्ट्रभाषा व मातृभाषाप्रेमी)अनु