अमुकच मॉडेलचा कॅसिओ घ्यावा असा सल्ला देण्यात काही अडचणी आहेत.
एक तर मी त्यातला तज्ज्ञ नाही.
दुसरे म्हणजे ते वाद्य विकत घेण्याचा बहुतेकांचा हेतू पुढे (किंवा लगेच) ते वाजवून गायकाला/गायनाला साथ करावी हा असतो. आताच्या काळात अशी साथ करण्यासाठी पाश्चात्य संगीत पद्धतीचा/धाटणीचा विशेषतः त्यातील कॉर्डसचा वापर होतो. शिवाय वेगवेगळी वाद्ये खुबीदारपणे मिसळून वाजवली जातात. हे सर्व तंत्र आणि त्याला लागणारे विशिष्ट मॉडेलचे वाद्य हे आपापल्या कुवतीवर ठरत असते. आपण म्हणता त्याप्रमाणे एखादा जाणकारच तुमच्या कुवतीचा, तुमच्या गरजेचा, इ. विचार करून योग्य सल्ला देऊ शकेल, पण तो जाणकार मी नाही.
महत्त्वाचे म्हणजे येथे संगीताची माहिती करून घेण्याचा उद्देश आहे, वाद्यवादन शिकण्याचा/शिकवण्याचा नाही. या दृष्टीने पहाता वाद्याच्या या अन्य क्षमतांचा हिंदुस्तानी संगीताशी व या लेखमालेशी काहीच संबंध नाही. म्हणून आपल्या आवडीप्रमाणे व बजेटप्रमाणे कुठलेही मॉडेल (विकत/उसने) घेतले तरी फरक पडणार नाही.
सेटिंग कुठले करावे? मला वाटते कंटिन्युअस स्वर (उदा. व्हायोलिन) हा आपण आपला स्वर त्यात मिसळून गाण्याचा प्रयत्न करण्यासाठी सोयीचा होईल, पियानो सेटिंग (एका क्षणात वाजून संपणारा स्वर) त्या दृष्टीने गैरसोयीचे ठरेल असे वाटते.
शेवटी कॅसिओ वा पेटी वा कळपट्टीवाले अन्य वाद्य हे फक्त (या लेखांपुरते) स्वर डोळ्यापुढे आणण्याचे, त्यांतील परस्परसंबंध जाणून घेण्याचे साधन आहे, यापेक्षा अधिक महत्त्व त्याला देण्याची गरज मला वाटत नाही. (अर्थात वाद्याचे मालक म्हणून आपले विचार यापेक्षा वेगळे असणे साहजिक आहे, त्याविषयी मला काहीच म्हणायचे नाही.)