आन हे बगा..
असबी लिवा
का मी खुस हाय;
आंग थनाकतंय म्हनावं,
गावापेक्षा बर हाय.
धगावानी मानूस येतो आन्
म्हनूर होतो बगा...
पन बबडी
डूक धरल्यावानी परतेकाला इचारते.
"माज्याकडं येन्याआदी
किती जनीकडं गेलता!"
अवं तो पुरुस;
तेंच्या बायकांनी दावं का सोडावं...
- हे तुमाला सांगते.
म्होरं लिवा-
मनीआडर उशिरानी का व्हयना,
पर जाती,
म्हनाव - नवी वजरटीक घडवलीय
वाक्या पाटिवल्यात इष्णूकडं.
आन् धा कमी पन्नास रुपयंबी.
नाम्याला चरडी
रोजचं धा पैसं द्या
म्हंजी पळल पोरगा साळेला.
-दोघास्नी मुकाबी लिवा.
आन हितंबी म्हागाई वाडलीय...
मानासाला नवी चादर लागती.
गिलासावरलं पानी उडालयं...
नुसत्या कंद्या न्हाई पुरत,
पंकाबी लागतो.
- हे नगा लिवू,
पर तुमी ऐकता म्हनून म्हनले.
बगा मला हसू येतंय,
सांगू का नगं, अस व्हतंय...
माग याक गिऱ्हाईक आलं,
"हितं ऱ्हान्यापरीस
बाईल व्हशील का? म्हनलं..."
"आता हाय की मी शेजंला तुमच्या - "
म्या म्हनलं, तवा ते तरपाटलं.
अख्ख्या पुरुस जातीचं मला हसू आलं.
हे कातड लई वंगाळ बगा.
मानूस गोचिडीवानी चिकाटतं.
आन् कायबी बोलून जातं.
पुरुस जातीचं मला हसू येतं,
अन रडूबी येतं बगा...
पर ह्या कातड्याची
ढोरावानी वड असती मानसाला.
कटाळा आला असंल तुमाला,
सगळंच कटाळल्यागत हाय.
येत जा तिकडं मदनंमदनं...
- नारायण सुर्वे.