बरेच जण हिटलरच्या कृत्यांकडे डोळेझाक करताना दिसत आहेत.
आतापर्यंतच्या चर्चेला आलेले मुद्दे असे -
"हा जरी जुलमी राज्यकर्ता असला तरी तो एकच माणूस होता जो जर्मनीसमोर सर्व देशांशी वाकडे घ्यायला तयार होता ! "
"स्वतः बद्दल येवढा प्रचंड विश्वास त्याने जर्मन लोकांमध्ये निर्माण केला होता. "
"हिटलर ने शुन्यातून जर्मनीला वैभवाच्या शिखरावर नेले. "
"केवळ ज्यू लोकांचे हत्याकांड केले, जगावर महायुअध्द लादले असे मित्रपक्षांनी प्रचार केल्याने तो व्हिलन ठरला. "
त्याने केलेले कृत्य हे अत्यंत निघृण आणि अक्षम्य असले तरी तो एक सच्चा मनुष्य होता जो जगासमोर केलेल्या पापाची कबुली देण्यास कचरला नाही. "
--
आज ह्यापैकी कुठचीही गोष्ट जर हिटलरने भारताच्या किंवा भारतीयांच्या विरोधात केली असती तर आपले हेच विचार राहीले असते का? आज जर्मनी वैभवाच्या शिखरावर आहे का? की जे हिटलरने केले आणि ज्याला तत्कालीन जर्मन जनतेने नकळत का होईना पाठिंबा दिला त्याचा परिणाम म्हणून आज जर्मनीला आपले स्वतंत्र सैन्य ही ठेवायची परवानगी नाही, ते तुम्ही विसरलात?
"प्रखर राष्ट्रभक्ती, कणखर नेतृत्व, अप्रतिम नेतृत्त्व गुण, असामान्य जनप्रेरणा, ऊत्कृष्ट नियेजन-दूरदृष्टी, लाभ रहीत सत्ता हे हिटलरचे गुण वाखाणावे लागतील."
हे सर्व खरेच असेलही, पण असे गुण असून त्याने जर्मनीला शरमेने मान खाली घालायला लावली हेही तितकेच खरे आहे.
"तात्पर्य इतिहास हा नेहेमी जेतेच लिहीतात व त्यामुळे हिटलर नराधम व ब्रिटन व अमेरिका हे मानवतेचे पाईक असे भ्रामक दृश्य जागापुढे उभे केले गेले आहे."
वरील सर्वांवर माझे मत असे आहे, की हे सर्व आपण लोकशाही जेथे कायद्याने मंजूर आहे अश्या देशात राहून, अश्या लोकशाही सरकारकडून घेतल्या जाणाऱ्या निर्णयांचे बरे -वाईट परिणाम अनुभवत बोलतो आहोत. अमेरिका इराक किंवा व्हिएतनाम मध्ये चुकीची असेल, पण तेथील जनतेने हा निर्णय त्यांच्या लोकनियुक्त प्रतिनिधींकरवी घेतला आहे. ब्रिटनबद्दलही तेच म्हणता येईल. तरीही युद्धाला तेथील असंख्य लोकांचा विरोध आहे हे वाचले आहे. त्यावरुन अमेरिकेत असंख्य ठिकाणी लिहिले गेले आहे, निदर्शने झाली आहेत, बुशला व्यक्तिशः विरोध करणारी जाहीर पत्रे लिहीली गेली आहेत. ही प्रक्रिया केवळ एखाद्या लोकशाही राष्ट्रातच होऊ शकते. कितीही संथ असली तरी तीच योग्य आहे. हिटलरशाहीत हे काहीच शक्य नाही. तुम्हाला खरेच वाटते का, की हिटलर ची भारताला आवश्यकता आहे?
प्रत्यक्षात आपण स्वतः आपल्या देशाच्या गाड्याला वळण द्यायला किती वेळ देतो? यात कोणावर टीका करायचा उद्देश अजिबात नाही, फक्त जागरूक करायचा नक्कीच आहे.
-सुहासिनी