अगदी लोकमान्य टिळकांनी गीतारहस्य लिहिताना कोणताही मराठी ग्रंथ न वाचल्याची दिलेली कबुली (ज्ञानेश्वरीसकट) ही पण अगदी आताआतापर्यंत संस्कृत व नंतर इंग्रजी या ज्ञानभाषा व मराठी ही सामान्य अडाण्यांची भाषा असल्याच्या समजाला पुष्टी देणारी आहे
विनायकराव - आपल्या या विधानाबाबतची माझी मतभिन्नता येथे देत आहे. आपल्याकडून अधिक माहिती मिळवून ही भूमिका कसोटीस लावण्याची नेहमीप्रमाणेच तयारी आहे.
वरील कारणमीमांसा ताणल्यासारखी वाटते आहे.
टिळकांनी गीतारहस्य लिहिताना ज्ञानेश्वरीचा आधार घेतला नसल्यामागे संस्कृत किंवा इंग्रजी यांना मराठीच्या तुलनेत अधिक वजन देण्याखेरीज इतर कारणे असावीत.
- ज्ञानेश्वरीचा गीतारहस्यासाठी संदर्भ दिलेला नसेल पण मराठीतील -- ज्ञानेश्वरीसह -- गीतेवरील कोणत्याही टीकेचे वाचन टिळकांनी केलेले नसेल हे कठीण वाटते.
- जरी वादासाठी कोणतेही गीतेवरील टीकेचे कोणतेही मराठी वाचन लोकमान्यांनी केलेले नव्हते असे गृहीत धरले तरीदेखील ...
टिळकांनी गीतारहस्य लिहिताना गीतेवर "स्वतः"चे भाष्य करण्यावर अधिक भर होता. इतर टीकाकारांनी केलेल्या निरूपणांपेक्षाही त्यांना कर्मयोगाचा जो राजकीय/सामाजिक संदेश द्यायचा होता त्यासाठी मूळ लिखाणावर भर देणे योग्य वाटले असावे. यांत भाषेचा संदर्भ कमी असावा.
- टिळक हे राजकीय/ राष्ट्रीय नेतृत्व आणि व्यक्तिमत्त्व होते. भाष्यकार आणि इतिहासतज्ञ अशी त्यांची क्षमता असली तरी तो त्यांचा जीवनमार्ग नव्हता. त्यामुळे संशोधकाकडून अपेक्षित असलेला सर्वच टीकांवरील गाढा अभ्यास कदाचित नव्हता हा टिळकांमधील दोष होता किंवा त्याहूनही पुढे म्हणजे हे त्यांनी केलेले अक्षम्य दुर्लक्ष होते असे म्हणता येणार नाही. भाषांच्या तुलनांचा निष्कर्ष तरी नक्कीच काढता येणार नाही.
- टिळकांनी गीतारहस्य हे वयाच्या ५२ व्या वर्षी मंडालेच्या एकाकी तुरुंगवासात लिहिले आहे. तेथे नेमके कोणते संदर्भग्रंथ उपलब्ध होते हा ही वेगळा विषय होऊ शकतो. अर्थात सर्व सोयी उपलब्ध असूनही टिळकांनी गीतेखेरीज ज्ञानेश्वरी किंवा इतर मराठी टीका मागविल्याच असत्या असे नाही. किती दिवस तुरुंगात राहावे लागेल, आणि तुरुंगातही किती निवांतपणा (?) मिळेल या गोष्टींचा विचारही किती संदर्भग्रंथ वाचायचे ही निवड करण्यामागे असण्याची शक्यता आहे.
अवांतर - राजकीय आकांक्षा, स्वप्ने आणि स्वराज्यासाठीचा धडपडाट या मानसिक व्यस्ततेतूनही मनाची उभारी ठेवून गीतारहस्यासारखे अजरामर आणि आधुनिक काळांस युक्त असे स्वतंत्र असे भाष्य त्यांनी केले ह्यांची महती वेगळीच आहे.
- टिळकांनी वेळोवेळी मराठी भाषेचा अभिमान -- केवळ बोलघेवडा नव्हे -- धरल्याचे आणि त्यादिशेने पावले उचलल्याची अनेक उदाहरणे आहेतच.
माझ्या वाचनानुसार टिळकांनी गीतारहस्यासाठी ज्ञानेश्वरीचा संदर्भ न घेणे यांत संस्कृत/इंग्रजी यांच्या तुलनेत मराठी ही ज्ञानभाषा नाही ही भावना अगदी असलीच तर फारच हलकीशी असावी.
जाणकारांनी अधिक प्रकाश जरूर टाकावा.
अवांतर - ज्ञानभाषा या नात्याने संस्कृत/इंग्रजी आणि मराठी ह्या कोणत्या स्थानावर आहेत हा स्वतंत्र चर्चेचा विषय होऊ शकतो.