वृकोदरजी तुम्हीही या मंदाररावांमुळे गोंधळेला दिसता!

ह्या कवितेचा अर्थ अगदी सरळ आणि साधा आहे. प्रियकराने प्रेयसीच्या रंगरुपाची स्तुती करणारे हे गीत आहे. कोणत्याही प्रियकराला आपली प्रेयसी स्वर्गसुंदरीच वाटत असते.

चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले
ओंजळी उधळीत मोती हासरी तारा फुले (ध्रु)

-- चंद्राच्या चांदणे जसे आल्हाददायक आणि स्फुर्तीदायक असते, तसा तुझा सहवास आहे. तुझ्या प्रत्येक हालचालीतून आणि हासण्यातून तू (आम्हा याचकांवर, तुझ्या रुपाच्या मोहिनीचे) असंख्य मोती आणि तारे उधळीत जात आहेस.

वाहते आकाशगंगा की कटीची मेखला
तेज:पुजाची झळाळी तार पदरा गुंफीले

ही तुझ्या कटीची मेखला ( मेखला हा एक सुवर्ण दागिना असतो. तो माझ्यामते कमरेवर बांधतात. चू. भू. द्या. घ्या.) आहे की प्रत्यक्ष आकशगंगा तू कटीला बांधली आहे? (जिथे जिथे मी आकशगंगेचे चित्र पाहिले आहे, त्या त्या चित्रात आकाशगंगेत अतिशय प्रकाशमान ग्रह तारे दिसले आहे. ) तुझे रुप असेच आकाशगंगेसारखे तेजःपूंज आहे. जणू आकाशगंगाच तुझ्या पदराला बांधली आहे. (तू इतकी तेजःपूंज आहेस की तुझ्या तेजाने दिपून सर्व आकाशगंगा -- केवळ जग नव्हे, तर सूर्यासहीत सर्व आकाशगंगा -- तू स्वतःच्या पदराला बांधून घेतल्यासारखे वाटते आहे. ) वाहते आकाशगंगा म्हणजे आकाशगंगा तुझ्या पदराला बांधल्यासारखी तू जाशील तिथे वाहत ( चालत नाही, वाहत-- दोन्ही क्रियापदातला सूक्ष्मार्थ ध्यानात घ्यावा) जाते आहे.

गुंतविले जीव हे मंजीर की पायी तुझ्या
जे तुझ्या तालावरी , बोलावरी नादावले  (२)

 

(इथे शब्दांची चूक आहे. नक्की शब्द शोधावे लागतील.) तुझ्या नादावर आणि तालावरच आमचा जीव झुलतो. इतका तुझ्या पायावर आम्ही जीव अर्पण केला आहे. इतके आम्ही तुझ्यासाठी  झुरत आहोत.

गे निळावंती कशाला झाकशी काया तुझी
पाहुदे मेघाविण सौंदर्य तुझे मोकळे (३)

प्रेयसी बहुधा सावळी असावी. म्हणून निळावंती! कशाला तुझ्या चंद्ररुपाला मेघांसारख्या कृर वस्त्रांचा अडसर? तो चंद्र आम्हाला ढंगांच्या ग्रहणाशिवायच पाहू दे.

असा साधा सरळ अर्थ आहे. ह्यात काहीही गुढ नाही. अतिशय कमी शब्दात अतोशय सुंदर अशी प्रियेची स्तुती आहे. ह्यात काही उपमा नावीन्यपूर्ण आहेत, त्यामुळे (कदाचित कुणाला) गूढतेचा भास होत असेल.