१) हिटलरचा द्वेष ज्यूंबद्दल होता,त्याने ज्यूंचा संहार केला, पोलंड वा रशियात त्याने आबालवृद्ध, महिला वगरे सरसकट जनतेच्या संहाराचे आदेश दिले नव्हते. ज्यूंवरील अत्याचार व हत्या निःसंशय अमानुष व समर्थनिय. पण म्हणून त्याने हिंदुस्थानातही तेच केले असते हा तर्क बरोबर नाही.
ज्यूंबद्दलच्या द्वेषाइतका प्रखर नसला तरी स्लाविक (म्हणजे पोलंड, रशियातील लोकांचा वर्ण), रोमानी (जिप्सी) व एकंदरीतच "अनार्य" (म्हणजे जर्मन आर्य वगळता इतर सर्व, कारण "जर्मन आर्यवंश हाच खरा शुद्ध आर्यवंश" हे तत्त्व!) यांच्याबद्दलचा हिटलरचा द्वेष सर्वज्ञात आहे. त्यामुळे ज्यूंपेक्षा पोलिश, रशियन हे "लोअर प्रायॉरिटी" होते इतकेच. त्यामुळे केवळ स्वतःला "आर्य" समजणाऱ्या आपल्यासारख्यांचा निभाव लागला असताच, तर केवळ "दखल न घेण्याइतके क्षुद्र" किंवा फार तर "संहाराकरिता लोअर प्रायॉरिटी" म्हणून लागला असता, इतकेच.
अवांतर: मुंबईत (सामान्य) सेनासमर्थकांच्या तोंडून "प्रथम 'हिरव्या'ला संपवू, मग 'बाकीच्यां'ना बघून घेऊ" अशा अर्थाची विधाने पूर्वी (उडतउडत) ऐकलेली आहेत, त्यातलाच प्रकार!
तसेही जर्मन सेनेने रशियन, पोलिश लोकांना प्रेमाने वागवले नाही. म्हणूनच सुरुवातीला स्टालिनच्या छळाला वैतागून जर्मन सेनांचे स्वागत करणारे रशियन लोकही नंतर जर्मनांविरुद्ध प्राणपणाने लढलेच.
२) हिटलरने नेताजींना आझाद हिंद सेना स्थापण्यास सर्वतोपरी मदत केली, त्यांना जोखीम घेऊन स्वखर्चाने देशाबाहेर पूर्वेला पोहोचवले. सबब त्याने आपल्यावर आक्रमण करून अत्याचार केले असते अशी भीती व्यर्थ आहे.
हिटलरचे इंग्रजांबरोबर युद्ध चालू होते. हिंदुस्थानात इंग्रजांचे राज्य होते. नेताजी इंग्रजांविरुद्ध लढत होते. त्यामुळे इंग्रजांना आणखी एक शह देऊन दुर्बल करण्याकरिता नेताजींना 'वापरताना' हिटलरचे नेताजींबद्दलचे / हिंदुस्थानविषयीचे / हिंदुस्थानवासीयांविषयीचे कोणतेही प्रेम उतू चालले नव्हते, केवळ स्वार्थ / शुद्ध 'मिलिटरी स्ट्रॅटेजी' होती.
अवांतर: बुजुर्गांकडून ऐकलेली गोष्ट आहे, स्वतः वाचलेली अथवा पडताळून पाहिलेली नाही, त्यामुळे तपशिलात थोडीफार चूक असू शकेल, कदाचित आपण ऐकली असेल किंवा नसेल, पण सांगतो. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावरसुद्धा सुरुवातीला काही अंतरिम काळाकरिता (पूर्ण स्थानांतरण होऊन भारतीय अधिकाऱ्यांची त्या जागी नियुक्ती होईपर्यंत) भारतीय लष्करप्रमुख/वरिष्ठ लष्करी अधिकारी इंग्रजच असत. (अर्थात त्यांना नेहरूंच्या [भारतीय] मंत्रिमंडळाबरोबर सल्लामसलत करूनच वागावे लागे.) तेव्हा तत्कालीन भारतीय (इंग्रज) लष्करप्रमुखाने नेहरूंना सल्ला दिला होता, की आझाद हिंद सेनेचे अधिकारी हे भारताच्या दृष्टीने थोर स्वातंत्र्यसैनिक आणि म्हणूनच वंदनीय आहेत हे योग्य आहे, त्यामुळे त्यांचा तुम्ही तुम्हाला योग्य वाटेल तसा राष्ट्रीय सन्मान करून हवे तसे त्यांचे पुनर्वसनही करणेही योग्यच आहे, परंतु भारतीय सैन्याच्या दृष्टिकोनातून भारतीय लष्करात लष्कराविरुद्ध बंड करणाऱ्यांना जागा नसावी. तेव्हा त्यांचे लष्करात पुनर्वसन होऊ नये, इतर कोणत्या प्रकारे त्यांचे पुनर्वसन अथवा सन्मान करावा हा स्वतंत्र भारताचा प्रश्न आहे. आणि नेहरूंनी तो सल्ला मानला होता, यात नेहरूंचे इंग्रजधार्जिणेपण निश्चितच नाही, असे वाटते. एकंदरीतच भारतीय लष्करात लष्कराविरुद्ध किंवा वरिष्ठांविरुद्ध तर सोडाच, पण सरकारविरुद्धसुद्धा बंडखोरी या प्रकाराला उत्तेजनाचा प्रघात नाही, किंबहुना 'तशी' राजकीय महत्त्वाकांक्षा असणाऱ्या अधिकाऱ्यांना वर येऊ दिले जात नाही, असे ऐकलेले आहे. (आणि ते योग्यच आहे. त्यामुळेच भारताची लोकशाही टिकून आहे; नाहीतर पाकिस्तानात काय घडते ते सर्वज्ञात आहे. लष्कर हे शासनाला subservientच [मराठी प्रतिशब्द?] असले पाहिजे. शासनाचे निर्णय पाळणे हे लष्कराचे कर्तव्य आहे. ते योग्य की अयोग्य हे ठरवण्याचा अधिकार लष्कराला नसावा; ते लष्कराचे कामही नव्हे.)
बाकी इंग्रज हे काही हिंदुस्थानावर प्रेमळपणे राज्य करीत नव्हते याविषयी सहमत. त्यांच्याविरुद्ध हिंदुस्थानवासीयांनी लढा दिला, द्यायलाच पाहिजे होता. केवळ ते जुलमी होते म्हणून नव्हे. अगदी प्रेमळ असते, तरीही इंग्रज ही बाह्यसत्ता होती, एवढे एकच कारण इंग्रजांच्या राज्याला विरोध करण्यासाठी पुरेसे होते. परंतु इंग्रज वाईट होते म्हणून हिटलरच्या (त्याही नसलेल्या) गुणांचा उदोउदो करण्यात अर्थ नाही.
- टग्या.
अवांतर:
ज्यूंवरील अत्याचार व हत्या निःसंशय अमानुष व समर्थनिय.
समर्थनीय???????? आपल्याला "असमर्थनीय" असे म्हणावयाचे आहे, अशी आशा आहे! "फ्रॉइडियन स्लिप" नसावी, असे वाटते.