पण कर्नाटकाची आणि महाराष्ट्राची तुलना केल्यास महाराष्ट्र प्रत्येक बाबतीत आघाडीवर आहे असे दिसते. रस्ते, वीज - पाणी पुरवठा, लोकांचे जीवनमान, कला.. या सगळ्याच गोष्टी.

काही वर्षांपूर्वी रस्ते/वीज/पाणी याविषयी अशी स्थिती होती, पण आता या सर्व बाबतीत महाराष्ट्रापेक्षा कर्नाटक पुढे आहे असे म्हणावे लागेल. महाराष्ट्रात शहरांत रोज ६ तास वीज नसते, खेड्यापाड्यात तर विचारूच नये.

पुणे-बंगळूर रस्त्याचे महाराष्ट्र आणि कर्नाटकातील काम पाहिलेत तर प्रचंड फरक आहे. भ्रष्टाचारामुळे महाराष्ट्रातील या रस्त्याचे काम रेंगाळलेले आणि निकृष्ट आहे.

कलेच्या बाबतीत कर्नाटक मागे आहे ही माहिती माझ्यासाठी नवीन आहे.

कर्नाटकातील लोकांचा कर्मठपणा, कर्मकांडे, जुने, प्रसंगी कालबाह्य ते कवटाळून बसण्याची वृत्ती, कुटुंबातले स्त्रीचे नगण्य स्थान...

अशीही परिस्थिती आता राहिली नाही. उलट बदल स्वीकारण्यात कर्नाटक आघाडीवर आहे असे दिसते. कर्मठपणामुळे असेल कदाचित पण जास्त चिकाटी आणि गुणवत्तेवर कटाक्ष हे फायदे झाले आहेत. व्यावसायिक शिक्षणाचा अभ्यासक्रम अतिशय आधुनिक आहे. संगणक आणि इतर आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात घेतलेली आघाडी याचेच द्योतक आहे असे वाटते.

समर्थ राजकीय नेतृत्वाचा अभाव असल्याने कर्नाटकाच्या विकासाला मोठी खीळ बसली आहे.

वास्तव परिस्थिती नेमकी याच्या उलट आहे असे वाटते. समर्थ राजकीय नेतृत्वाअभावी अधोगती महाराष्ट्राची झाली आहे. कृष्णांच्या कारकिर्दीत बंगळूर जगाच्या नकाशावर गेले. एक काळ असा होता की पुणे आणि बंगळूर संगणक तंत्रज्ञान क्षेत्रात जवळपास एकाच पातळीवर होते, पण आता निर्विवादपणे बंगळूर भारताची "संगणक-तंत्रज्ञान राजधानी" झाली आहे.

व्यक्तिपूजा आणि विवेकहीनता कमीअधिक प्रमाणात भारतभर सगळीकडे आहे.

तात्पर्य असे की एके काळी आघाडीवर असलेला महाराष्ट्र दिशाहीन नेतृत्वामुळे पिछाडला आहे. अर्थात कर्नाटकातही सर्व गुलाबी आहे असे नाही. विकासाचा असमतोल तिथेही आहे. पाण्याचा प्रश्न, दुष्काळाचा प्रश्न असे इतरही प्रश्न आहेत.