नोस्टल्जीया या शब्दाला (प्रतिशब्द म्हणून नव्हे) आक्षेप घेऊन कुशाग्र यांनी स्वप्नरंजन या शब्द सुचवला आहे. एकतर हा शब्द फारसा समर्पक नाही. नोस्टाल्जीया मध्ये जी एक उदासवाणी - आता परत या शब्दावर आक्षेप येणार नसेल तर - मेलन्कली - छटा आहे ती स्वप्नरंजनमध्ये नाही. त्या दृष्टीने मी वापरलेली 'रम्य भूतकाळ' हाच शब्द अधिक समर्पक- किमान मला अभिप्रेत असा आहे.
मराठी शब्दांच्या वापराबाबत आग्रही असतानाच तो आग्रह अनाठायी नाही ना याबाबत जागरूक रहाणे गरजेचे आहे. टेबलला मेज, रेल्वेला अग्निरथ, रेनकोटला जलधाराप्रतिबंधक दशगुंडी बंडी हे तांत्रिकदृष्ट्या योग्य असले तरी व्यवहार्य नाही.'अति सर्वत्र वर्जयते' हे सगळीकडेच लागू ठरावे.
पु. ल.च्या स्मृतिदिनानिमित्त गंहिवरण्यावर आपला आक्षेप तर अगदी बिनबुडाचा आहे.
पु. लं. च्या स्मृतीदिनानिमित्त ( अस्सल किंवा उसने) गहिवरण्याला माझा आक्षेप नाही. आपण महाराष्ट्रीयन अशा भूतकाळात अडकून पडतो आहोत का हा माझा (किंवा मला पडलेला ) प्रश्न आहे. तसे होतच आहे असा माझा आरोप नाही.
आपल्या पितरांच्या श्राद्धदिनी भक्तिपूर्वक श्रद्धांजली वहाणाऱ्यावर आपण हाच आक्षेप घ्याल का?
हा मला वाटते ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा प्रश्न आहे. याबाबत माझी मते मी वारंवार नोंदवली आहेत त्यामुळे मी विषयांतर करू इच्छीत नाही.
आपणच तलत, गालिब यावर गहिवरून लेख लिहिले आहेत न?की तो केवळ वरवरचा देखावा होता? वर्तमानात रहाणे याचा आपल्यामते अर्थ भूतकाळ विसरणे असा तर नाही ना?
कधीकधी 'मनोगत' चे स्वरूप मुष्टीयुद्धाच्या आखाड्याचे होत चालले आहे की काय अशी शंका येते. निकोप चर्चा आणि त्यातून विचारांची देवाणघेवाण अशा अपेक्षेने मांडलेल्या मताचे भलतेच अर्थ घेतले जातात. तलत, गालिब, आणि पु. ल. सुद्धा यांच्यावरील माझी श्रद्धा अतिशय अस्सल अशीच आहे. महराष्ट्रीयन माणूस, मग त्यात मी सुद्धा आलो, हा भूतकाळात रममाण होणारा आहे, त्यामुळे नवीन कलावंतांचे कौतुक करण्यात किंवा नवे काही स्वीकारण्यात हात आखडता तर घेतला जात नाही ना, या करीता हा केवळ हा मुद्दा चर्चेसाठी मांडला होता.
सन्जोप राव