अगदी थोड्याच दिवसापूर्वी "देह झाला चंदनाचा"हे राजेंद्र खेर लिखित पुस्तक वाचले आणि मी फ़ारच प्रभावित झालो.पुस्तक पू.पांडुरंगशास्त्री आठवले यांच्यावर आहे.पुस्तक ओघवती भाषाशैलीत लिहिले आहेच त्यामुळे ते पूर्ण वाचल्याशिवाय चैन पडत नाही. पू.पांडुरंगशास्त्री यांच्या स्वाध्याय परिवाराविषयी मी फक्त ऐकले होते पण त्यासाठी या माणसाने कसे भगीरथ प्रयत्न केले आणि त्यासाठी कोठल्याही प्रकारची आर्थिक मदत शासन आणि संपन्न व्यक्तींकडूनमिळत असताना नाकारली,येवढेच काय पण स्वतःची वडिलोपार्जित जमीनसुद्धा प्रथम भावाला देऊन पूर्ण निष्कांचन होऊन हे देवाचे कार्य आहे आणि ते होणे देवास मंजूर असेल तर ते तडीस जाईल या श्रद्धेने त्यानी परदेशात येण्याची गळ घालणाऱ्या विद्वान मंडळीना नकार देऊन या कार्याचा आरंभ केला आणि आपल्यापरीने जास्तीत जास्त पूर्ततेस कसे नेले या प्रयत्नांची ही कहाणी आहे.डॉ.राधाकृष्णन् यानीसुद्धा त्याना या कामासाठी मदत न घेण्याचा त्यांचा हट्ट हा वेडेपणा आहे असे म्हटले. हे पुस्तक प्रत्येकाने वाचावे असे मला वाटते.आजच्या स्वार्थी जगात असे काहीतरी स्वार्थविरहित प्रचंड कार्य कोठल्याही बाह्य मडतीशिवाय होऊ शकते हे या पुस्तकाच्या वाचनानेच कळते.आपल्याला नवीन जीवनदृष्टी देणारे हे पुस्तक आहे.
याव्यतिरिक्त डॉ. नितू मांडके यांच्या पत्नीने लिहिलेले "सुहृद्",डॉ. हिम्मत बावस्कर यांचे आत्मचरित्र "बॅरिस्टरच कार्ट"डाँ. नरेंद्र जाधव यानी लिहिलेल आत्मचरित्रात्मक "आमचा बाप आणि आम्ही" डॉ.प्रेमानंद रामाणी यांचे आत्मचरित्र "ताठ कणा" ही सर्वच पुस्तके परिस्थिती अनुकूल नसतानाही अथक परिश्रमाने माणूस खरोखरच नराचा नारायण कसा होऊ शकतो हेच दाखवतात.
याशिवाय (दुर्दैवाने कै.)प्रकाश संत यांची लंपनवरील पुस्तकमालिका,सौ . सुधा नारायणमूर्ती यांची वाइज ऍंड अदरवाइज,आणि छोट्या कथा ही दोन अनुवादित पुस्तके ,श्री.विठ्ठल कामत यांचे "इडली दोसा आणि ऑर्किड" ही सर्व अलिकडे वाचलेली आणि लक्षात रहाणारी पुस्तके.