आम्हा परदेशस्थ भारतीयांत तर स्मरणरंजनाचे प्रमाण फारच आहे. त्याचा मला खूप कंटाळा येतो. म्हणून मी नेहमीच पुष्कर लेलें, राहुल देशपांडेंसारख्या नवीन गायकांच्या तबकड्या विकत घेत असतो.
हा एक नवीनच पण फार महत्वाचा विषय आहे. परदेशी कायमचे वास्तव्य करावे की नाही या विषयावर वेगळी चर्चा झालेली आहेच. पण परदेशात राहून संपूर्ण शरीराने व मनाने त्या देशाचे होऊन, शक्यतोवर आपण आता भारतात परत जायचेच नाही हे मनाशी पक्के ठरवून अधूनमधून उत्तेजनार्थ ' माझा भारत..माझा महाराष्ट्र..माझं पुणं..' अशा ओकाऱ्या काढणाऱ्यांची संख्याही कमी नाही. आपले डॉलरध्येय, नाही म्हटले तरी आपण या देशात उपरे आहोत ही असुरक्षितता आणि स्वतःच्या मनाशी प्रामाणिक राहून विचार केला तर आता आपल्याला भारतात रहाणे अशक्य झाले आहे ही किंचित त्रासदायक जाणीव याचे परिमार्जन करण्यासाठीच की काय, पण परदेशात राहून 'माझा भारत, माझा भारत' अशी छातीफोड करणे, भारतातल्या खेपांमध्ये संपूर्ण मोठ्मोठ्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होणे, परदेशात जिथे असू तेथे कितीही विसंगत दिसत असले तरी आपल्या यथासांग मॅकडोनाल्डी मुलांना घेऊन नथी आणि नऊवारीसकट झब्बट लुटुपुटुचे सांस्कृतिक कार्यक्रमच सादर करणे.... असे करण्याची वेळ येते. माझा एक मित्र याला 'बाटलेला मुसलमान अधिक कडवा असतो असे म्हणतो'. असे स्मरणरंजन हे प्रामाणिक न वाटता मुद्दाम काढलेले उमासे वाटतात. यापेक्षा 'मला याचा कंटाळा येतो' हा मिलिंदचा प्रामाणिकपणा बरा.