रावसाहेब, शुभेच्छांबद्दल मनःपूर्वक आभार.

संकेतस्थळावर वावरणाऱ्यांची अनामिक रहाण्याची इच्छा लक्षात घेतली तर संकेतस्थळाच्या माध्यमातून एकत्र आलेल्यांचे असे ध्रुवीकरण अनावश्यक आहे हेही ध्यानात येईल.

--- एक तर अशा कोणत्याही स्नेहसंमेलनामुळे, कट्ट्यासारख्या कार्यक्रमामुळे विचारांचे, कलेचे, संस्कृतीचे आणि मनांचेही ध्रुवीकरण होते, हा विचारच तद्दन चुकीचा आहे (आपण याव्यतिरिक्त अन्य कोणत्या ध्रुवीकरणाबद्दल बोलत आहात, हे आपल्यालाच माहीत. आपण त्याबद्दल काही नमूद केलेले नाही) खरे तर अशा स्नेहसंमेलनांमुळे विचारांची देवाणघेवाण होते. काही क्षण काव्यशास्त्रविनोदात, मनमोकळ्या गप्पांमध्ये घालवता येतात. नवनवीन मित्रमैत्रिणी मिळतात (हे विधान स्वानुभवावर आधारीत आहे) आणि मित्रवर्तुळाचा परीघ रुंदावतो. मनोगतच्या आज़वरच्या विविध कट्ट्यांद्वारे हे सिद्ध झाले आहे. माझ्यालेखी असे होणे हे समाजप्रिय माणसाच्या सकारात्मक वाटचालीचे सूचक आहे. त्यामुळे यात कुठेच कसलेही ध्रुवीकरण झालेले दिसत नाही. अमेरिकेतील कट्ट्यामुळे तमाम भारतीयांचा पैसा या देशात येऊन पडला असता अगर कट्ट्यामुळे अमेरिकेत एके ठिकाणी पैशाचे केंद्रिकरण आणि भारतात दुसरे अर्थकेंद्र, तर आम्ही त्याला  आर्थिक ध्रुवीकरण म्हटले असते. या कट्ट्यामुळे भारतातले तमाम गुणवंत कलाकार, विचारवंत, नेते इ. इ. येथे केंद्रित झाले असते नि अमेरिकेतील एक गट आणि भारतातील दुसरा गट असे गट पडले असते, तर आम्ही त्याला कलेचे, विचारांचे इ. चे ध्रुवीकरण म्हटले असते. पण अशा कट्ट्यामुळे कधीच असे काही घडलेले नाही. खरे तर भारतात आतापर्यंत झालेल्या कट्ट्यांच्या वेळी एतद्देशीय मनोगतींना प्रत्यक्ष हजेरी न लावता आल्याची खंत वाटते. तरीही आम्ही येनकेनप्रकारेण आमच्या शुभेच्छा आमच्या भारतातील मित्रमंडळींपर्यंत पोचवून आणि कट्ट्याचा वृत्तांत आणि क्षणाचित्रांद्वारे तेथल्या कार्यक्रमांचा आनंद अनुभवतो. यात आपल्याला कसले ध्रुवीकरण दिसते? कोणताही परदेशस्थ मनोगती भारतात गेल्यावर तेथील मनोगती मित्रांची आवर्ज़ून भेट घेतो. याला कसले ध्रुवीकरण समज़ायचे? त्यामुळे अशा कार्यक्रमांतून या संकेतस्थळाद्वारे एकत्र आलेल्यांचे ध्रुवीकरण होते आहे, असे समज़णे योग्य नाही. केवळ अमेरिकेत राहतोय, म्हणून आम्ही अमेरिकन (खरे तर अमेरिकास्थित) मनोगती आणि आमचे भारतातले मित्र भारतीय (भारतात असलेले/राहणारे) मनोगती. पण या शब्दच्छलाला ध्रुवीकरण का बरे समज़ावे? आज़ 'एक मनोगती' या एकमेव ओळखीवर अशा स्नेहसंमेलनांचे आयोजन करण्यासाठी परस्परसहकार्य, वेळ आणि पैशाची गुंतवणूक ज़र मनोगती करत असतील, तर त्यात कसले ध्रुवीकरण आले?

राहता राहिला भाग अनामिक राहण्याचा. मनोगताच्या कोणत्याही कट्ट्याप्रसंगी हा कट्टा मनोगताचा 'अधिकृत' कट्टा असल्याचे नि त्यातील सहभाग हा स्वतःच्या खऱ्या नावानेच वावरणाऱ्या मनोगतींपुरताच मर्यादित असल्याचे वगैरे कधी घोषित केले गेल्याचे आठवत नाही. तसेच हा कट्टा केवळ मनोगतींपुरताच आहे, इतरांसाठी नाही,असेही घोषित झालेले नाही. त्यामुळे ज्यांची अनामिक राहण्याची इच्छा असेल, त्यांनी अशा कार्यक्रमाला उपस्थित रहावे(च), असा आग्रह ज़री असला, तरी मनोगतावरील आपले खरे नाव उघड करावे(च), अशी काही पूर्व अट कधीच नव्हती आणि नसेलही. सगळ्यांसाठी त्या वेळी 'मनोगती' एव्हढी ओळख पुरेशी असते. तसेच बिगर मनोगती कट्टेकऱ्यांना अशा कट्ट्याच्या माध्यमातून या संकेतस्थळाबद्दल माहिती मिळाल्याचे आणि त्यांनी येथे सदस्य म्हणून नोंदणी केल्याचेही किस्से आहेत.

त्यामुळे आंतरजालावरील तसेच या किंवा कोणत्याही संकेतस्थळावरील अनामिक वावर आणि कोणत्याही प्रकारचे ध्रुवीकरण यांच्यातला परस्परसंबंध स्पष्ट न करता आपण सरसकट असे विधान करणे अनाकलनीय आहे.

'आपण नेटवर एकमेकांना चांगले म्हणतोच की, मग प्रत्यक्ष भेटून एकमेकांना अधिक चांगले का म्हणू नये?' असा प्लास्टीकपणा करण्याची गरज असेलच

--- अशी कोणतीही गरज़ येथे आपण सोडून इतर कोणाला ज़ाणवल्याचे मला तरी दिसत नाही. येथील एखाद्या कलाकृतीबद्दल अनुकूल/प्रतिकूल मत दिले, अगर कोणत्याही चर्चेत अनुकूल/प्रतिकूल विचार मांडले, तर ते मत किंवा विचार संबंधित व्यक्तीबद्दल नसून ते त्या कलाकृतीबद्दल किंवा मताबद्दल असते. त्यामुळे कोणी कोणाला एक व्यक्ती म्हणून खाज़गीत/जाहीरपणे चांगलेवाईट म्हणण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मुळात एखादी व्यक्ती मूलतः वाईट असते किंवा असेल असे मला वाटत नाही. विचारसरणी, वर्तन इ. मुळे अशा चांगलेवाईटपणाचा शिक्का संबंधित व्यक्तीवर पडत ज़ातो. अतः प्रस्तुत 'प्लास्टीकपणा'चा तुमचा मुद्दा कट्ट्याच्या किंवा तत्सम स्नेहसंमेलनाच्या दृष्टीने गैरलागू ठरतो.

 शुभेच्छांबद्दल पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार. पण एकीकडे मनोगताचे व्यसन ज़डण्याबद्दल "इथे तसा नवीनच असूनही मलाही मनोगत चे व्यसनच जडले आहे की काय अशी शंका येऊ लागली आहे. हे हवेहवेसे वाटणारे व्यसन अधिकाधिक लोकांना जडो आणि एकमेकांची आयुष्ये समृद्ध करण्यात सर्वांचाच हातभार लागो." असे विधान आपणच नजीकच्या भूतकाळात करणे आणि कट्टा किंवा तत्सम स्नेहसंमेलनास ध्रुवीकरण (कसले ते आपण सांगितलेच नाहीत) संबोधणे हा दुतोंडेपणा मला पटला नाही (आणि आपले कोणतेही प्रमाण/स्पष्टीकरण न देता
केलेले विधानसुद्धा!) म्हणून हा प्रतिसादप्रपंच! उलट अशा कट्ट्यामुळे किंवा तत्सम कार्यक्रमांमुळे आपली सदिच्छा फलद्रूप होण्यासच हातभार लागणार आहे, हे आपल्या लक्षात न आल्याची खंत वाटते. चूभूद्याघ्या