मा. संजोप राव,

स्मरण रंजन हा कोणा एका समाजाचा (शब्द बरोबर वाटतोय का?)/ व्यक्ति गटाचा (जसे मराठी, केरळी इ. इ.) स्वभाव धर्म आहे असे नाही.

तो सर्व मानव समाजाचाच एक अविभाज्य घटक/पैलु आहे!

जसे प्रत्येक जण "माझ्या लहाणपणी " आम्ही अशी गंमत करायचो तशी गंमत करायचो असे सांगत असतात. तसे बघितले तर सगळ्यांचेच बालपण (भूतकाळ) रम्यच असतो... "ज्याच्यात्याच्यासाठी"!  (कधी कष्टांचा, कधी सुखासमाधानाचा...)

दुसऱ्याला ते ऐकताना कधी कंटाळा येतो, कधी चांगले आणि ऐकत रहावेसे वाटते, कधी कधी नविन लोकांना प्रेरणादायी ठरते.

तर मला वाटते की भूतकाळात रमणे हा काही दोष नसावा. उलट भूतकाळ हा एक पाठीराखा, भविष्यासाठीचा गुरू, शिक्षकच आहे असे मला वाटते.

आपण म्हटल्या प्रमाणे " अति सर्वत्र ...." तसे होणे केव्हाही आणि कुठेही घातकच होय!

दुसरे असे की आरोप - "मराठी माणूस फारच नोस्टाल्जीक आहे असा एक साधारण आरोप आहे."

तर मला असे वाटते की आपण ज्या समाजात अधिक काळ राहतो त्याची जवळुन ओळख/परिचय असते/असतो.  त्यातिल व्यक्तिंचे भावविश्व याच्याशी आपण परिचीत असतो. आपण मराठी माणसात जास्ती रहात आहोत त्यामुळे कदाचित आपणास तसे वाटत असणार. (मी पुण्यातच रहातो)

बाकीच्या समाजात आपण काही काळच असतो, त्यामुळे त्यांच्याविषयी आपण असे ठामपणे म्हणु शकत नाही की ते स्मरण रंजन करत नाहीत किंवा आपल्यापेक्षा कमी करतात.

एक उदा. आपण पारशी लोकांबद्दल बोलतो, मा. सर्वसाक्षी यांचाच एक लेख आहे "वाहन देवता" (वाहन देवता लेख हा वेगळ्या पठडीतला आहे, पण जुण्या मर्सिडीज गाडी मध्ये पारशीबाबाचे मन किती गुंतलेले आहे याचे वर्णन केले आहेच... म्हणुन संदर्भ घेतला.)  तशाच गोष्टी बऱ्याच पारशी लोकांबाबत ऐकल्या आहेत, की ते त्यांच्या जुन्या गोष्टीत फ़ारच रमतात.

तेव्हा मला तरी वर नमुद केलेला आरोप (मराठी माणुस) अनाठायी वाटतो.

आता मुद्दा नवीन लोकांकडे दुर्लक्ष किंवा त्यांच्यावर होणारा अन्याय... तर मला असे वाटते की जुन्याची आठवण काढणे ठेवणे म्हणजे नवीन लोकांवर लगेच अन्याय होतोय असे नाही. तर आपण थोडेसे निरिक्षण केले तर असे दिसते की नवीन लोक/कलाकारच आनंदाने/अभिमानाने/आदर/श्रध्दा  या सर्व भावनेने जुन्या लोकांच्या आठवणी काढत असतात. आणि त्याच जुन्या लोकांच्या नावाखाली/छायेखाली आपल्या भविष्याची पाळे मुळे भक्कम करत असतात.

पु. लं च्या कार्यक्रमात, त्यांची गाणी नवीन कलाकारच म्हणतात, त्यांचे लेख नवीन कलाकरच वाचतात, त्यांची जुनी नाटके नवीन कलाकरच सादर करतात....

मग सांगा प्रोत्साहन कोणाला मिळतेय.... अर्थातच नवीन लोकांना, नाही का? 

शिवाय काही काही कार्यक्रमा मध्ये नवीन लोकांना त्यांच्या कलाकृतींना आवर्जुन वाव दिला जातोच...

तर आपण वर नमुद केलेले दोन्ही मुद्दे मला तरी फ़ारसे योग्य वाटत नाहीत...

आपला,

--सचिन