अगदी तसंच जस्सच्या तसं... खरंच आता फक्त आठवणी त्या सर्वांच्या...
क्रिकेटच मैदान अगदी माझ्या घराच्या खिडकीला
लागून असल्याने खेळ चालू
व्हायच्या अगोदर आमच्या घरातून नळाला तोटी लावून पूर्णं मैदानाला पाणी
मारायचं काम मी आणि षेकू उत्तम करायचो... आणि त्यानंतर जसं
इथे "वात्रटाने"ही
लिहिलं आहे अगदी तसाच आमचा खेळ रंगायचा. चाळीतली सर्व लहान-थोर एकत्र
येऊन खेळायचो. गमतीचा भाग असा की चेंडू बऱ्याचदा शेलार काकांच घर
खिडकीमार्गे गाठायचा.. आणि काकू त्या चेंडूचे दोन भाग करून
निर्विकारपणे खिडकीमार्गेच बाहेर द्यायच्या... भोळ्यांचा
सागर संघाचा चांगला खेळाडू असल्याने त्यांच्या घरी गेलेला चेंडू आम्हाला
सहीसलामत मिळायचा
पण सागर घरी पोहोचल्यावर त्याची चेंडू सारखी गत झालेली असायची... आमचे
डॅडीही खेळत असल्याने त्यांना ह्या परिस्थितीची जाण होती आणि म्हणून आमच्या
खिडकीची जाळी ह्यागोष्टी लक्ष्यात ठेवूनच तयार केली होती.
साधारणपणे हस्तकला हाच 'पुंगळु' पेपर शेवटी असे. त्यामुळे त्याआधीच माझे उन्हाळ्याच्या सुट्टीचे आराखडे मनात जमायला सुरु होत. एकदा का हस्तकलेचा पेपर उरकुन तो पेपर बाईंच्या हाती दिला की मग आमचा आनंद अगदी गगनात मावेनासा होई. मुलांची आपापलं सामान गोळा करत एकमेकांशी बोलताना अगदी झुम्मड उडुन जाई. सगळ्यांच्या चेहे-यावर परीक्षा संपल्याचा (नि अभ्यासाची कटकट गेल्याचा) आनंद अगदी ओसंडुन वहात असे.
सुट्टीचा आनंद पुरेपुर उपभोगायला लगेच दुस-याच दिवसापासुन सुरुवात होई, यात क्रिकेट खेळण्याचा कार्यक्रम महत्वाचा असे. सकाळी सातपर्यंत उठुन,सगळं आवरुन नि काहीतरी पोटात टाकुन आम्ही ८ वाजेपर्यंत खेळाच्या जागी पोहोचत असु. कधी मैदानावर, कधी एखाद्या मित्राच्या घराच्या मागे अंगणात खेळ रंगे. क्वचितप्रसंगी आमच्या शेजारच्या घराच्या दारातच असलेल्या आंब्याच्या मोठ्ठ्या झाडालाही यष्टींचं काम करावं लागे. मग जो खेळ सुरु होई, तो कुणाची तरी आई आम्हाला जेवायला बोलवेपर्यंत. घड्याळात पाहिले तर चक्क दुपारचे १२ किंवा १ वाजलेले असत ! खेळण्यात, चिडण्यात, वाद घालण्यात पाच तास कसे भुर्रकन उडुन जात. घरी आल्यावर मग जेवण नि झोप. अगदी चार पर्यंत. मग पुन्हा मित्रांकडे, तिथुन कुठेतरी भटकायला किंवा अशीच टंगळमंगळ.