गेल्या वर्षी आम्ही गणेशचतुर्थीच्या दिवशी शिकागोच्या "लेमॉन्ट टेम्पल" मधे गेलो होतो. तिथल दृष्य काय वर्णाव?
अमेरिकेत सहसा ३ गॅ. चा दुधाचा कॅन मिळतो. असे अंदाजे १०-१५ कॅन फक्त एका गणेश मूर्तीवर रिते होत होते. त्यानंतर मधाने, तुपाने यथेच्छ आंघोळ. रिते झालेले सर्व पदार्थ मोरीतून सांड्पाण्यासह वहात होते. चंदन, अत्तर, फुले, गंध, हळद, कुंकू, कापूर अशा गोष्टींचा हिशेब येथे न केलेलाच बरा. भाविक श्रद्धेने हात जोडून भगवंतांची आंघोळ पहात होते.
असो. अशा गोष्टी विकत घेऊन वापरल्याने लहान सहान विक्रेत्यांचा फायदाच होतो, त्यांच्या पोटापाण्याची सोय होते असे म्हणणारे बरेच लोक भेटतात. कदाचित त्यांच म्हणण खर असेल.
आम्ही मात्र यापुढे या देवळात जाऊन देवाच्या नावे देणगी, दान करायचे नाही असे ठरवले. त्यापेक्षा आम्ही काही आदीवासी मुलांच्या शिक्षणाचा खर्च देतो तो यावर्षी पासून दुप्पट करण्याचे ठरवून आलो.