बंड्या,
सुंदर उपक्रम.
अनेक उदाहरणं मनात येत राहतात. जशी आठवतील, तशी देतोय..
(१) 'रावसाहेब' (गणगोत) मधे शेवटी एक वाक्य असं काहीसं आहे...
'आपलं जीवन सुंदर करायला आलेली ही माणसं.. तो न मागता देतो आणि तोच उचलून घेऊन जातो.'
पु. ल. गेले तेव्हा १२ जूनला मला सारखं हेच वाक्य आठवत होतं.
(२) 'मी आणि माझा शत्रुपक्ष' (पुस्तक आठवत नाही) मधलं 'आम्ही फक्त मनातच बोलायचे...' (याची रोज अनेक वेळा प्रचीती येते).
(३) 'गाळीव इतिहास' मधलं 'पाहा-तळटीप. यावरून आम्ही विद्वत्तेचा किती तळ गाठला आहे हे तुमच्या लक्षात येईल.'
(४) 'गाळीव इतिहास' मधलं 'आकाशवाणीचे अभंग जर मुक्ताबाईनं ऐकले असते, तर 'काठी उचला ज्ञानेश्वरा' असं म्हटलं असतं.'
(५) 'मी हरून अल रशीद' (पुस्तक आठवत नाही) मधलं 'शोक अनावर झाल्यामुळे ते जागीच कोसळले, या वाक्यात पत्रकारानं चुकून शहामृगाच्या 'श' ऐवजी पोटफोड्या 'ष' छापला. दुसऱ्या दिवशी चुकीची दुरुस्ती छापली, पण 'अनावर' ऐवजी 'जनावर' छापलं!'
(६) 'नंदा प्रधान' (व्यक्ति आणि वल्ली) मधलं (त्याच्या मृत ज्यू प्रेयसीबद्दल तो म्हणतो).. 'झुरळालाही घाबरणारी ती नाझी सैनिकांना काय करणार होती?'
(७) 'बटाट्याची चाळ' मधली शिवाजीजी आणि अफझुलजी यांची 'अहिंसात्मक' लढाई. 'मराठी आणि यावनी भातशेतीवरून शिवाजीजी आणि अफझुलजी यांत मतभेद होते... शिवाजीजी यांनी मराठी भातशेतीचं एवढं हृदयद्रावक वर्णन केलं की त्यामुळे अफझुलजी यांची आतडी पिळवटून निघाली आणि त्यांचा देहांत झाला.' (हे नीट आठवत नाही, फार पूर्वी वाचलं होतं).
(८) 'चितळे मास्तर' (व्यक्ति आणि वल्ली) चा शेवट- 'मास्तर.. नेहमीची सवय. वहाणा विसरलात..... त्या रॅकवरून मास्तरांच्या वहाणा शोधणं कठीण गेलं नाही. कुठल्याच वहाणा इतक्या झिजलेल्या नव्हत्या.'
(९) 'बाळा नो नो रे' (उरलं सुरलं) मधलं.. आकाशवाणीवर कुटुंबनियोजनाच्या कार्यक्रमानंतर बाळराजा ला मोजा शिवणे हा कार्यक्रम लागतो तेव्हा 'शिव्या मोजाव्या का मोजे शिवावे'....
(१०) 'तुझे आहे तुजपाशी' मधलं 'स्थितप्रज्ञ कसा दिसतो?' हे वाक्य आणि गाढव त्यावेळी तिथे असणं..आणि एकंदरित आचार्यांच्या विचारप्रणालीवर त्यांनी केलेली टीका.
- कुमार