'मनोगत' च्या सध्याच्या सक्तीच्या कैदेत तुमच्या प्रश्नाचे जरा सविस्तर उत्तर देण्याचा प्रयत्न करतो.
आपल्यासारख्या सर्वसामान्यांचे आयुष्य हे आहार, भय, निद्रा.... अशातच अडकून पडलेले असते.आपल्या अपेक्षा, आकांक्षा, आनंदाच्या कल्पना या साधारण सामान्य आणि एकसारख्या असतात. 'सुटीचा दिवस चांगला घालवण्याची तुमची कल्पना काय?' असा प्रश्न विचारला तर शंभरातले नव्वद लोक साधारण एकसारखे उत्तर देतील. यातले उरलेले दहा बाकी वेगळेच असतात. एकाच घरात, एकाच संस्कारात वाढलेल्या मुलांपैकी एखादा वेगळाच असतो. काहीवेळा तो ( जी.एं. सारखा) असामान्य प्रतिभेचा, एखाद्या क्षेत्रात डोंगराएवढे काम करणारा निघतो. काहीवेळा तो माणूसघाणा, एकलकोंडा, क्वचित व्यसनी, गुन्हेगारी प्रवृत्तीचाही निघतो. प्रवीण महाजनांचे उदाहरण याबाबत ताजे आहे.
हे असे का होत असेल? याला काही जैविक - बायॉलॉजिकल - कारण आहे का? की हा संपूर्ण अनुभवांचा आणि संस्कारांचा भाग आहे? माझ्या मते या दोन्ही गोष्टी खऱ्या असाव्यात. काही झाडे एका ठराविक टप्प्यापर्यंत नैसर्गिक रीत्या वाढतात. नंतर त्यांच्यात काहीतरी विकृती निर्माण होते. मानवी मनोव्यापार हे तर अतिशय क्लिष्ट आणि गुंतागुंतीचे आहेत. मानवी मनाच्या जडणघडणीवर कशाकशाचा परिणाम होत असेल कुणी सांगावे?
जी.ए. लहानपणापासूनच अत्यंत बुद्धीमान होते. त्यांचा व्यासंग दांडगा होता. कलेच्या विविध क्षेत्रात त्यांचा अधिकारपूर्ण वावर होता.( ते एक उत्तम चित्रकार आणि चांगल्यापैकी शिल्पकार होते ) जगातील उत्तमोत्तम साहित्याची त्यांना जाण होती. दुर्दैवाने त्यांना सख्ख्या नात्याचे - जी.एं. च्या शब्दांत आतड्याचे - कुणी फारसे लाभले नाही.  जी.एं. चा जीवनविषयक नकारात्मक दृष्टीकोन तयार होण्यात या गोष्टीचा मोठा वाटा असावा. त्यांच्या लिखाणातील शोकांतिकांचे आकर्षण त्यांचे वाचन आणि त्यांचे अनुभव यावरून आलेले असावे. उदाहरणच द्यायचे झाले तर त्यांच्या लिखाणातील स्त्रियांचे वर्णन त्यांच्या समग्र स्त्रीजातिविषयक पूर्वगृहाचे दर्शन घडवते. जी.एं. ना स्वतःविषयी बरेच कॉम्प्लेक्सेस -गंड- होते. त्यांचे शारीर रूप, त्यांची व्यंगे याविषयी ते कमालीचे संवेदनशील, हळवे होते.
आपल्याला लिखाणातून दिसणारे जी.ए. हे या सगळ्याचा परिपाक आहेत, असे मला वाटते. या सगळ्याबरोबरच जी.ए. अत्यंत संकोची पण प्रखर स्वाभिमानी होते. 'काजळमाया' ला मिळालेले साहित्य अकादमीचे पारितोषिक त्याविषयी किंचीत तांत्रिक वाद निर्माण होताच त्यांनी तडक परत केले आणि कितीतरी मान्यवरांनी प्रयत्न करूनही त्यांनी ते परत घेतले नाही. या सगळ्याबरोबर ते आपल्या निर्मीतीविषयी नम्र होते. ते स्वतःच्या लिखाणाविषयी लिहीतातः
'तसा मी वाङ्मयात थोडासा साप धरणारा माणूस आहे. आतापर्यंत एखादा काळापिवळा उन्मत्त साप हाती लागायचाऐवजी गांडूळ, निरुपद्रवी, हिरवे गवती सापच मी पकडले. पण माझा मार्ग तोच, यशापयश येथेच. सगळयांच्याच वाट्याला उग्र, जहरी असे भीषण सर्प पकडण्याचे दोस्तोव्हस्कीचे भाग्य येते असे नाही...'
तुमच्या प्रश्नाचे उत्त्तर मी दिले की नाही ते ठाऊक नाही, पण जी.एं. चे व्यक्तीमत्व बाकी असे जटील, गूढ आहे.

सन्जोप राव