संजोप राव ,
चर्चेचे खुले व्यासपीठ ते आपली भांडणाची खुमखुमी जिरवण्याचे मैदान हा बदल अस्वस्थ करणारा आहे. या तुमच्या विधानाला मीही सहानुभूत आहे. "शामची आई" संदर्भात मी मांडलेल्या काही मुद्यांवरून झालेल्या चर्चेच्या वेळी मी हा अनुभव घेतला. माझी विधाने म्हणजे साने गुरूजी व त्यांच्या आईविषयी मी व्यक्तिगत स्वरूपाचे अनुदार शब्द वापरत असल्याचा काही मनोगतींनी समज करून घेतला असावा. वास्तविक माझ्या मूळ प्रस्तावातच मी "शामची आई" (चित्रपट व कथा दोन्ही) चा लहानवयात प्रभाव पडला होता, मात्र ही कथा आता अनुपयोगी वाटते असे स्पष्ट नमूद केले होते. तरीही काही मनोगतींची प्रतिसादात्मक विधाने वाचताना मला चुकीच्या पद्धतीने विषय हाताळला जात असल्याचे जाणवत राहिले. अखेर पुन्हा एकदा (दि. ९/५/२००६ चे माझे प्रतिसाद पहा.) मला वेगळे स्पष्टीकरण द्यावे लागले होते. अर्थात कोणा एका विशिष्ट मनोगतीविरूद्ध माझी तक्रार नाही. पण "शामची आई" (कथा व चित्रपट) संदर्भात माझी व अन्य मनोगतींची वैचारिकता यातील संबंध शोधण्याचा माझा उद्देश मात्र काहीसा फसल्यासारखे मला वाटत राहिले.कदाचित मुद्दे मांडताना मीच कमी पडलो असेल, पण तो विषय कधी कधी भरकटत गेल्यासाऱखे वाटत राहिले. समाधान एवढेच की बहुतांश मनोगतींचे मुद्दे ( भले माझ्या विरोधात होते पण) शामची आई ही कथा समजून घेण्यात आपण तर कमी पडलो नाही ना ,असा विचार करायला लावणारे होते. हेही नसे थोडके.असो. तुमच्या " भांडणाची खुमखुमी जिरवण्याचे मैदान" या शब्दांमुळे ती आठवण झाली, एवढेच या लेखनाचे निमित्त,ही तक्रार मात्र नाही..
अवधूत.