ऱॉबेर्टो बेनिनिचा 'Life is Beautiful' मधील गायदो चा मृत्यु एक वेगळाच, संपूर्ण चित्रपटाला एक वेगळ्या उंचीवर नेणारा, अचानक आलेला, आल्याची जाणीव होईपर्यंत निसटून गेलेला, नव्या पहाटेकडे नेणारा.

आपल्या पत्निला भेटण्यासाठी स्त्रियांच्या बराकीमधे घुसू पहाणाऱ्या गायदोला एक जर्मन सैनिक पकडून घेउन येतो. अगदी सहज पणे त्याला तो एका इमारतीच्या मागील बाजूस घेउन जातो. त्याच्याबरोबर जात असताना गायदो एका रिकाम्या खोक्यासमोरून जातो, ज्यात त्याचा एकुलता एक मुलगा लपलेला असतो. आपण छळछावणीत आहोत हे  त्याच्यापासून हरप्रयत्नाने लपवून ठेवलेले असते. त्या खोक्यासमोरून जाताना गायदो सैनिकासारखा left-right करीत जातो, आणि जाताना खोक्याच्या भोकातुन डोकावणाऱ्या मुलाला डोळा मारतो. जणु त्याला विश्वास देतो, की अत्ता हा खेळ संपेल. मी हरलो म्हणून काय झाले. तु एकटाच उरला आहेस या खेळात, तू नक्की च जिंकणार आहेस आणि तुझे बक्षीस म्हणून तुला तुझा रणगाडा नाक्की मिळणार आहे. आपणही क्षणभर आश्वस्त होउन जातो तेंव्हाच...

गायदो आणि तो सैनिक इमारतीच्या मागील बाजुस जातात, बंदुकीची एक फैर ऐकु येते, सैनिक एकटाच परत येतो. एखादे साधेसे काम उरकुन आल्यासारखी सहज बंदुक खांद्यावर लावत निघून जातो. बस्स, एव्ह्ढेच. मृत्युची अटळता आणि गायदोने त्याचा सहज केलेला स्वीकार. संपूर्ण चित्रपट व्यापून राहिलेला तो मृत्यु असा अचानक येउन जातो.

काय झाले आहे हे आपल्या लक्षात येईतो, कमेरा खोक्याकडे फिरतो आणि त्यातुन त्याच्या मुलाचा - जोशुआचा - डोळा दिसतो.

चित्रपटाचा शेवट अतिशय सुरेख आहे. जरूर पहावा असा. कोणी पाहीला नसेल तर अवश्य पहा.