या विषयाचे खरे ज्ञान मिळण्यासाठी जुने ग्रंथ धुंडाळावे लागतील, ते नसताना कल्पनाशक्तीच्या जोरावर स्पष्टीकरण देतो आहे. १००% असेच असेल असे सांगता येत नाही पण असे काहीसे असावे असे वाटते.
सा पासून र्सा पर्यंत बावीस श्रुती असतात.
(१) दोन श्रुतींमध्ये सारखे अंतर असेल (हे माझे गृहीत) तर त्यांच्या कंपनसंख्येचे गुणोत्तर = २ चे २२ वे मूळ = १.०३२०१. हे आणि संस्कारित पट्टीमधील १.०५९४६ या दोन्ही संख्या एकमेकांच्या पटीत बसत नाहीत. त्यामुळे श्रुती व कळपट्टीवरील म्हणजेच संस्कारित पट्टीवरील स्वर यांची स्थाने/कंपनसंख्या एक असणार नाहीत
(२) शिवाय क्र.१ वर सा असेल, आणि समजा क्र. ३ वर रे व क्र.४ वर रे असेल (हे माझे उदाहरणार्थ गृहीत) तर सा-रे आणि रे-रे यांतले अंतर समान असणार नाही. (संदर्भग्रंथाअभावी कितव्या श्रुतीला कोणता स्वर {नैसर्गिक/भारतीय परंपरेला अनुसरून} असला पाहिजे हे सांगू शकत नाही). याउलट संस्कारित पट्टी बनवतानाच कृत्रिम रीत्या दोन स्वरांत सारखे अंतर ठेवण्यात आलेले आहे.
[तज्ज्ञांनी चूक असल्यास मार्गदर्शन करावे]
वरील गोष्टींमुळे दोन्ही पट्ट्यांतील स्वर जुळणार नाहीत. म्हणून हा वाद निर्माण होतो.
नैसर्गिक पट्टी जुन्या मौखिक परंपरेवरून गुरुमुखाने आलेली आहे (भारतीय परंपरा) तर संस्कारित पट्टी गणिताने तयार केलेली आहे (पाश्चात्य परंपरा).  एकीकडे अंतःस्फूर्ती तर दुसरीकडे बुद्धिप्रामाण्य मानणाऱ्या दोन भिन्न परंपरांतला हा भेद/वाद आहे.
आता मुद्दा कळला असेल अशी आशा करतो.