काही काही वेळा एकाच विचारावर दोन वेगळे लेखक / कवी साधारण एकाच काळात आपले विचार मांडतात. काही वेळा एका लेखकाच्या विचारावरून स्फूर्ती घेऊन दुसरा लेखक त्याचा अधिक विस्तार करतो. "अवर स्वीटेस्ट साँगज आर ऑफ अवर सॅडेस्ट थॉट्स' या शेलीच्या रचनेवरून शैलेंद्रने 'हैं सबसे मधुर वो गीत जिन्हें हम दर्द के सुर में गाते हैं' हे लिहीले. ' द रोड नॉट टेकन' या रॉबर्ट फ्रॉस्ट्च्या रचनेसारखे हरीवंशराय बच्चनांचे ' जीवन की आपाधापी में' आहे. तलतचे 'ऐ दिल मुझे ऐसी जगह ले चल' हेसुद्धा गालिबच्या एका रचनेवरूनच लिहीलेले आहे.
हे केवळ लेखनाच्या क्षेत्रात आहे असे नाही. गाण्यांच्या चालींच्या उचलेगिरीबाबत आपण नेहमी ऐकतो. गंमत म्हणजे भल्याभल्या संगीतकारांनी हे केले आहे. मदनमोहन हे माझे अत्यंत आवडते संगीतकार. त्यांनीही सज्जादच्या 'ये हवा ये रात ये चांदनी' वरून 'तुझे क्या सुनाऊ मैं दिलरुबा' बेतले आहे. अनिल विश्वासच्या 'सीनेमें सुलगते हैं अरमाँ' वरून 'तुम चांद के साथ चले आओ' घेतले आहे. अर्थात त्यामुळे मदनजींचा मोठेपणा कमी होत नाही हा भाग वेगळा.