'तलत इन ब्ल्यू मूड' ही खरोखर एकट्याने ऐकणाची चीज आहे. द्वंद्वगीते ऐकताना माझी तरी जरा पंचाईत होते.' इक ऐसी आग लगी मन में, जीने भी न दे मरने भी न दे... ' या टीपेला गुणगुणतानाही माझा आवाज फाटतो. त्यामुळे अशा वेळी साथ द्यायला 'ती' असेल तर बरे. नाहीतर आहेच आपले 'एकला चलो रे..'

ही अडचण मलाही येते, पण अशा वेळी मी ती संपूर्ण ओळ/ त्यातली ती तान बेंबीच्या देठापासून ओरडून गाऊन पुरी करतो. जमते! आजूबाजूला कोणी असेल तर त्याचे/तिचे हाल होतात, तो भाग वेगळा, पण शेवटी आपल्याला पुरेपूर आनंद मिळाल्याशी कारण!

अवांतर: मी असे काही करू लागलो, की पूर्वी शेजारच्या सीटवरून (हल्ली बरेचसे गाणे ऐकणे गाडी चालवतानाच होते.) बायको "आता बास्!" म्हणून मला गप्प करण्याचा (निष्फळ) प्रयत्न करीत असे. सध्या (म्हणजे लग्नाच्या सात वर्षांनंतर) "हा सुधारणेच्या पलीकडचा आहे" म्हणून तो नाद तिने सोडून दिलेला आहे. मात्र त्याऐवजी मागच्या सीटवरून "Daddy, no singing!" असे (अत्यंत हुकमी आवाजात - मुलगा तयार होत आहे!) ऐकू येते. (तसेही "मामाच्या गावाला जाऊया" आणि "ट्विंकल ट्विंकल लिट्ल स्टार" [किंवा तत्सम] यांव्यतिरिक्त काहीही ऐकायला आम्हाला [दोघांनाही] सध्या सक्त मनाई आहे.)

*अतिअवांतर: लग्नानंतर (कदाचित "ढवळ्याशेजारी बांधला पवळ्या" न्यायाने) माणूस (as in both sexes) बदलतो म्हणतात, ते खरे असावे. एकेकाळी मी 'दिल-ऐ-नादान तुझे हुआ क्या है' वगैरे 'आमच्या काळातली गाणी' गाऊ लागलो, की 'लव्हेरिया हुआ' म्हणून प्रत्युत्तरादाखल खिजवणारी बायको, आजकाल क्वचित/नकळत का होईना पण तलत (आवडीने!) ऐकू शकते. आणि मीही संदीप खरे ('त्याला पाऊस आवडत नाही, तिला पाऊस आवडतो' वाला संदीप खरेच ना हो तो? पहिल्यांदा ते गाणे ऐकले तेव्हा भयंकर डोके फिरले होते!) वगैरे थोडाफार 'टॉलरेट' करू शकू लागलो आहे. त्यामुळे गाण्याच्या आवडीनिवडीवरून आजकाल आमचे वाद होत नाहीत.

त्याऐवजी एकमेकांच्या गाडी चालवण्याच्या पद्धतीवरून हल्ली आम्ही एकमेकांची डोकी खातो!

- टग्या.