रोहिणी, वृत्तांत छान झाला आहे. तांत्रिक गोष्टींमधल्या माझ्या मागासलेपणाने (!)मी खूप काही मुकवलं असं वाटत आहे. खैर इस बार नहीं तो कभी और सही !
फादर्स डेच्या सुमुहुर्ती बाबांना भेटायची संधी अचानकच चालून आल्याने रविवारी सकाळी पुण्याला पळायचे असल्याने मी कट्ट्याचा बेत माझ्यापुरता रहित करायच्या विचारात होते. सर्व मनोगतींना बोलावून मग असं वागणे अजिबात बरोबर नाही या माझ्याच मनाच्या तक्रारीसमोर मान तुकवून मी साधारण सातसव्वासातला रेषेवर आले. बघितलं तर संदीप आणि संवादिनी यांनी मला आधीच त्यांच्या फ्रेंडलिस्टमध्ये सामील करून घेण्यासाठीची परवानगी मागितलेली दिसली. ती विनंती मान्य करताच कळलं की संदीपदेखिल रेषेवरच आहेत ! आमचे नमस्कारचमत्कार झाले. इ-कट्टा म्हणजे नेमकं काय याबद्दल त्यांच्या मनात जबरदस्त प्रश्न आणि उत्सुकता आहे हे मला जाणवलं. मनातल्या मनात खूप गंमत वाटत होती. अजून कोणीच आलेलं दिसत नव्हतं. संदिपशी बोलताना मुंबईकर-पुणेकर वाद सुरू होतो की काय अशी धास्ती माझ्या मनात निर्माण होताच 'ती मी नव्हेच !' असं म्हणून मी नामानिराळी झाले. नेहमीप्रमाणे मयुरेश ( याचं घर बहुदा याहूमध्येच असावं असं वाटतं ! ) रेषेवर होताच. त्याला विचारता, थोड्यावेळात येतो म्हणाला.
संदीपशी थोड्या गप्पा होत नाहीत तोवर रोहिणी आली. मग एकेक जण येत गेले आणि नंतरचा वृत्तांत तर रोहिणीने लिहिलेलाच आहे. वृत्तांतात न आलेल्या काही गोष्टी नमूद कराव्याशा वाटत आहेत, म्हणून करते आहे.
ओंकार रिझर्वेशनबंदीशी संबंधित विचार मांडण्याबद्दल खूपच गंभीर असून कळकळीने काही बोलू/चर्चू इच्छित होता, हे तो इ-कट्टा सोडून गेल्यानंतर त्याच्याशी झालेल्या इ-गप्पांमध्ये लक्षात आलं. इ-कट्टा म्हणजे काही जणं जमणार, गप्पा होणार, चर्चा होणार... हेच अपेक्षित असल्याने त्याने असा महत्त्वाचा मुद्दा चर्चेला घेण्याची इच्छा प्रदर्शित करण्यात काहीच गैर नव्हते ( हे माझे व्यक्तिगत मत आहे. ). इ-कट्टा आयोजित करताना त्यातील कार्यक्रमांबद्दलची रूपरेषा मी आधीच नीट आखलेली नसल्याने ओंकारच्या झालेल्या विरसाबद्दल मी अत्यंत दिलगीर आहे.
'इत्यादी' हे माझ्या फ्रेंडलिस्टमध्ये आधीच होते. शेवटी कधी बोललेलो हे ना त्यांना आठवे ना मला. मी बोलते आहे कळताच त्यांनी मला त्यांची एक कविता पाठवू का विचारले. मी हो म्हणताच हळूच ती कविता आमच्या गप्पांमध्ये दिसली. छानच होती. मी त्यांना सरळसरळ मनोगतच्या इ-कट्ट्यात येणार का विचारून मोकळी. त्यांचा प्रश्न - सुभाष आहे का? माझे उत्तर - नाही. ठीक आहे बोलवा असं त्यांनी म्हणताच त्यांना निमंत्रण पाठवलं तर ते कट्ट्यात सामील झाले. आल्यावर "सुभाष, कसे आहात?" असे म्हणाले. मी चाट पडले. कविता करणारी व्यक्ती 'सुभाष' विचारते आहे म्हणजे सुभाषचंद्र आपटे अभिप्रेत असतील असं मला वाटलेलं. हे बोलून दाखवता ते म्हणाले मला तेच अभिप्रेत होते पण मी याही सुभाषना ओळखतो ! खूप मजा येत होती.
संवादिनीची 'चिंतातुर जंतु' कविता कधी झाली हे मला कळलेच नाही पण चक्रपाणिची गजल चालू होती तेव्हा मला हे कळलं की चक्रपाणि काहितरी सादर करत आहे, नक्की काय, कुठे आणि कसा ते कळत नव्हते. मला फक्त 'वा वा.. छान.. मस्त' असे शब्द शाब्दिक कट्ट्यावर दिसत होते. मी याबद्दल दोनदा सांगितले देखील पण सगळे बहुदा ऐकण्यात मग्न होते. कुठलीच तांत्रिक सुविधा उपलब्ध नसल्याने हळूहळू मला वगळल्यासारखे वाटायला लागले. ( तसे करणे कोणालाही अपेक्षित नसणार याची मला खात्री आहे. पुढील इ-कट्ट्यात असे होऊ नये असे प्रामाणिकपणे वाटत आहे म्हणून इथे नमूद करते आहे. राग नसावा. ) सगळे जमेतोवर माझे १०ही वाजले होते आणि कॅफेवाले आजोबा पेंगायला लागले होते. त्यांच्या सहनशक्तीची परिसीमा होण्याअगोदरच निघालेलं बरं असा सुज्ञ निर्णय घेत एक-दोन जणींना याहू व्यनिमधून मी इ-कट्ट्याचा निरोप घेत आहे असे सांगून परतले.
जवळपास वर्षा-दीडवर्षापूर्वी मनोगतींचे असे इ-कट्टे जवळपास रोजच संध्याकाळी व्हायचे. अगदी व्यक्तिगत सुखदुःखापासून ते कुठल्या सामाजिक प्रश्नांपर्यंत, गप्पा मारतामारता कविता-गजला लिहिण्यापासून ते कथेमधल्या चुका समजावून सांगून त्या सुधारण्यात मदत करण्यापर्यंत, मतभेद असलेल्या मुद्द्यांवर अगदी हिरीरीने मुद्दे मांडत वाद घालण्यापासून ते काही कारणांनी चिडलेल्या/रुसलेल्यांची मनधरणी करण्यापर्यंत निरनिराळे पैलु हाताळले जायचे. संध्याकाळ कधी होते याची मी वाट पाहायचे तेव्हा ! माझं कार्यक्षेत्र बदललं आणि हळुहळु या सर्वात हजेरी लावणं मला अशक्य व्हायला लागलं आणि मग पूर्णच बंद पडलं. आजही हे इ-कट्टे चालू आहेत असं ऐकून आहे. ( नक्की माहिती नाही. ) बऱ्याच दिवसांनी याहूमध्ये रेषेवर आल्याने खूपच वेगळंवेगळं वाटत होतं. इतके सगळेजणं एकदम रेषेवर आलेले पाहून खूप आनंद झाला. काय बोलू आणि काय नको असं होऊन गेलं होतं ( याची परिणती शेवटी काहीच न बोलता बाहेर पडण्यात झाली, ही वेगळी गोष्ट आहे.. :D ). इ-कट्ट्याचं मी अनुभवलेलं रूप अगदीच वेगळं होतं जे अगदीच प्राथमिक ( तांत्रिक बाबींबद्दल ) तरीही जिव्हाळ्याचं होतं आणि १७ला अनुभवलं ते अगदीच पुढारलेलं ( तांत्रिक बाबींबद्दल ) आणि खेळीमेळीचं होतं. दोन्हींची धाटणी वेगळी त्यामुळे तुलना करणे सर्वथा चुकीचेच, हे अगदी मान्य. नविन इ-कट्ट्यांमध्येही जमेल तेव्हा हजेरी लावत रहायची खूप इच्छा आहे, पण फक्त शाब्दीकच कट्ट्यात सहभागी होता येईल ही अडचण आहे ( मला तशी ती वाटत नसली तरी आजच्या जगात आहे असं म्हणावं लागेल असं दिसत आहे खरं ! ).