राखी सावंतचा अश्लील नाच, त्यावरच्या लोकांच्या प्रतिक्रिया, मोडतोड, मग तिच्या पुढच्या कार्यक्रमात ( अपेक्षा वाढलेल्या लोकांसमोर ) तिने तसा नाच केला नाही म्हणून झालेली तोडफोड, अक्षरशः रोज समोर येणारे एक नवीन लैंगीक गुन्हेगारीचे प्रकरण, अश्लील तबकड्यांचा सुळसुळाट, डान्स बार या प्रकाराने उघडकीस आलेली मोठी लैंगिक उपासमार..
या निमित्ताने जरा वेगळा विचार मांडावासा वाटतो. भारतासारख्या उष्ण कटीबंधातल्या भागात मुलेमुली लवकर वयात येतात. आता सरसकटच लग्नाचे वाढते वय आणि भारतीय संस्कृतीतली विवाहपूर्व शरीरसंबंधाविषयक बंधने लक्षात घेतली तर लोकसंख्येचा एक मोठा भाग एका मोठ्या काळासाठी लैंगिक सुखाला वंचित रहातो. इतर सर्व नैसर्गिक भुकांप्रमाणे ही भूकही जितकी दडपली जाईल तितकीच उफाळून वर येते. शरीराची ही मागणी नाकारणे हे अनैसर्गिक नाही का? पण संस्कृतीसंरक्षणाच्या नावाखाली सगळ्या तरूण पिढीने किमान लग्न होईपर्यंत असे ध्यानस्थ लंगोटबंध रहावे अशी अपेक्षा केली जाते. लैंगिक व्यवहाराविषयीचे - सेक्सविषयीचे - कुतुहल शमावे म्हणून 'सॉफ्ट पोर्न' अशा प्रकारच्या पण नैसर्गिक व अविकृत सिनेमाला सेन्सॉरने परवानगी द्यावी ही विजय आनंद यांची सूचना अगदी थयथयाट करून धुडकावली गेली. आणि तरीही तरूण पिढी 'बंबई रात की बाहों में' अशा पध्दतीच्या घाणेरड्या, कलाहीन आणि बऱ्याचदा अशास्त्रीय सिनेमांना गर्दी करते आहे, माहितीजालावरच्या अश्लील संकेतस्थळांचे आसुसून 'सर्फिंग' करते आहे, विकृत लैंगिक व्यवहारांच्या तबकड्यांची देवाणघेवाण करते आहे. पश्चीम महाराष्ट्रातल्या सांगली सारख्या जिल्ह्यात मुंबईच्या खालोखाल एडसचे रोगी आहेत...
'बिढार' मध्ये चांगदेवचा मित्र म्हणतो, 'खुल्लमखुल्ला ***** दो सालोंको.. दो सालमें अपने आप ठंडे पड जायेंगे... ' यातली भाषा सोडून द्या, पण लैंगिक व्यवहाराबद्दलच्या आपल्या दुटप्पी कल्पना सोडून देण्याची वेळ आली आहे असे वाटते. लैंगिक पावित्र्य, ब्रम्हचर्य अशा कल्पनांचा पुनर्विचार होणे गरजेचे आहे असे माझे मत आहे. अर्थात याचा अर्थ स्वैराचार असा नाही. पण एकंदरीतच लैंगिकतेविषयीच्या आपल्या विचारांत मोकळीक आणि जबाबदारीची जाणिव आणली तर आयुष्यातल्या एका सुंदर अनुभवाला पारखे व्हावे न लागता तरूण पिढीचे लैंगिक वैफल्य दूर होऊन राखी सावंतसारखे प्रकार होणार नाहीत असे मला वाटते.
तुम्हाला?